Gadkari, Fadnavis should give justice to the farmers : शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमाफीची काँग्रेस प्रवक्त्यांची मागणी
Akola केंद्रीय अर्थसंकल्पात कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ५ वर्षांपासाठी कापूस उत्पादकता मिशनची घोषणा करण्यात आली. परंतु कापुस उत्पादक भागांमध्ये टेक्सटाईल पार्कच नाहीत. अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. तरी हा पार्कच आम्हाला दिसला नाही, अशा शब्दात प्रदेश काँग्रेसचे मुख्य व राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रविवारी केंद्र सरकारवर टीका केली. अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रवक्ते सुधीर ढोणे, अतुल अमानकर, भुषण टाले उपस्थित होते. राज्यातील महायुतीचे शासन कास्तकारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत उदासीन आहेत. सोयाबीनच्या दराबाबत सरकार चालढकल करत आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तेंडाला पाने पुसली आहेत. विदर्भ पूत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी विदर्भाला न्याय द्यावा, असे आवाहन लोंढे यांनी केले.
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सरकारने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करुन सोयाबीनला ७ हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा अशी मागणी सुद्धा लोंढे यांनी केली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र यात शेतीसाठी अत्यल्प तरतूद करण्यात आली. विदर्भ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त विभाग आहे. पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याची टिका प्रवक्ते लोंढे यांनी केली.
Krushna Khopde : नागपूरकरांना Ground Rent पासून मुक्ती द्या!
सोयाबीनला प्रती क्विंटल ७ हजार रुपयांचा भाव देण्याची ग्वाही भाजपने दिली होती. मात्र आता अकोल्यात ४ हजार २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. अशात शासकीय साेयाबीन खरेदी सुद्धा बंद झाली. हेक्टरी उत्पादन खर्च वाढला तरी शेतकऱ्यांना उत्पन्न मात्र त्या तुलनेने मिळत नाही. मनरेगाअंतर्गतही काम मिळत नसून, सामान्यांसह सर्वच समाज घटकांचा फसवणूक भाजपने केली, असाही आराेप प्रवक्ते अतुल लाोंढे यांनी केला.