Breaking

Atul Save : भविष्यातील शिक्षकांची फळी मुल्याधिष्ठ शिक्षणाची ज्योत पेटवणार !

Atul Save is confident for the teachers will ignite the flame of value-based education : विद्यार्थ्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग व रेकॉर्ड व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेता येणार 

Mumbai : महाराष्ट्र शासन सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंमलात आणत आहे. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील टीएआईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ नवीन शासकीय शिक्षण धोरणाला अनुसरून ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘महाज्योती’चे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, या ऑनलाईन प्रशिक्षणातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरी बसून तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआईटी) परीक्षेपूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय ‘महाज्योती’तर्फे घेण्यात आला आहे.
‘महाज्याती’कडे अर्ज करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग व रेकॉर्ड व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेता येणार आहे. शासनाच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणातून भविष्यात घडणारी शिक्षकांची फळी ही राज्यातील मुल्याधिष्ठ शिक्षणाची ज्योत पेटविण्यास नक्कीच हातभार लावणार, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील (एस.बी.सी) विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. यंदाच्या वर्षी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआईटी) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सन 2025-26 या वर्षातील टीएआईटी परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ‘महाज्योती’ने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 8 एप्रिल 2025 रोजी पासून सुरु केलेली आहे. सदरचे अर्ज ‘महाज्योती’च्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. ‘महाज्योती’मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआईटी) पूर्व प्रशिक्षण या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली असल्याचे ‘महाज्योती’चे  प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले.