Padalkar Awhad apologized in the Legislative Assembly and admitted his mistake : पडळकर आव्हाडांनी विधानसभेत माफी मागत कबूल केली चूक
Mumbai : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद विधानसभा परिसरातील हाणामारी पर्यंत गेली. आणि राज्यभर खळबळ उडाली. हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र सरकारवर टीका होत आहे. घडलेल्या प्रकरामुळे आता विधानभवन परिसरातील सर्व सामान्यांच्या प्रवेशाला निर्बंध घालण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्षांनीच या संदर्भातील निवेदन सभागृहात केले.दोन्ही आमदारांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.
विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात सांगितले की, 17 जुलै रोजी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, विधान भवन इमारतीच्या प्रवेश दारावर दोन अभ्यागतांमध्ये मारामारी झाली. विधानमंडळ व विधिमंडळाचे सदस्य यांच्या बद्दल टीका टिप्पणी करण्यात आली ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्याकडून तात्काळ घटनेचा अहवाल मागवला.त्यावरून असे निदर्शनास येते की, दोघांची अचानक मारामारी सुरू झाली. सुरक्षा पथकांनी ही मारामारी थांबवली. त्या अभ्यागतांना ताब्यात घेऊन विचारपूस केली,तेव्हा नितीन देशमुख यांनी सांगितले की, तो जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता आहे. तसेच दुसरा व्यक्ती सर्जेराव बबन टकले याने सदस्य गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले. यां दोघांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू आहे. याप्रकरणी कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना हे अभ्यागत विधानभवनाच्या आवारात सदस्यांसोबत अनाधिकृतपणेआले व त्यांनी मारामारी करून आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले.
विधान मंडळाच्या परिसरामध्ये यापूर्वी अशी घटना कधीही झालेली नाही. सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला विधानभवनात आणण्याची आवश्यकता नाही. सदस्यां बरोबर एखादा व्यक्ती आलाच तर त्याच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही चुकीच्या वर्तणुकीसाठी संबंधित सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. मी या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणत आहे की, विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे. सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे. सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे. सभागृहाच्या प्रथा, परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये.
विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधले जाते. अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. लोकांचा लोकशाही वरील विश्वास दृढ राहावा असे सदस्यांचे वर्तन असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतीमूल्य कमिटी घटित करण्याचे विचाराधीन आहे. लवकरच सभापतींशी विचार विनिमय करून या विषयाचा निर्णय एक आठवड्यात घेण्यात येईल. सर्वांनाच माहित आहे पार्लमेंट मध्ये जी कमिटी आहे त्या कमिटीकडे खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचेही अधिकार आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या काही घटना घडल्या त्यामुळे विधानसभा सदस्यांप्रती लोकांच्या मनात अनादर निर्माण होईल की काय ?अशी शंका निर्माण होत आहे. विधान मंडळाच्या उच्च, प्रथा, परंपरा याचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे. विधान मंडळाचे सदस्य म्हणून आपण कायदेशीर शपथ घेतलेली आहे. त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने मी जाहीर करत आहे की, विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्माननीय सदस्य,त्यांचे अधिकृत पीए व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल . इतर व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत अध्यक्ष व सभापती यांच्या समवेत असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्रिमहोदयांना विधान मंडळात बैठक घेण्याची व अभ्यागतांच्या प्रवेशाची परवानगी देण्यात येणार नाही .
आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख व पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलीन करणारे असल्याने, एक प्रकारे सभागृहाची विशेष अधिकारभंग व अवमान त्यांनी केला आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करून मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करीत आहे.