Latur based leader becomes Guardian Minister of Gondia : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जबाबदारी
Gondia राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत गोंदियाला गृहजिल्ह्यातील पालकमंत्री कधीही मिळाला नाही. प्रत्येकवेळी पालकमंत्री आयात करण्यात आले. आताही तेच होणार होते. कारण गोंदिया जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. या एकूण पार्श्वभूमीवर विदर्भातील दुसऱ्या नेत्याला गोंदियाचे पालकमंत्रिपद देता आले असते. मात्र लातुरच्या नेत्याकडे गोंदियाचे पालकत्व सोपविण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गोंदियाचा विकास कसा साधणार, याकडे लक्ष लागलेले असेल.
जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची भुमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात जाणार अशी चर्चा होती. ती चर्चा शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर खरी ठरली आहे.
Eknath Shinde : हिमाचल आणि जम्मू-काश्मीरचा उबाठाला जय महाराष्ट्र !
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत जिल्ह्याला लाभलेले सर्व पालकमंत्री हे बाहेरीलच होते. तर चार वर्षात सहा पालकमंत्री मिळाल्याचा इतिहास सुध्दा जिल्ह्याच्या नावावर आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातूच चारही आमदार महायुतीचेच निवडून आले. त्यामुळे यापैकी कुणाची तरी मंत्रीमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती.
मंत्रिमंडळात जिल्ह्याची पाटी कोरीच राहिल्याने पुन्हा जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळाणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे गेल्या दीड महिन्यापासून जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या होत्या. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात गोंदियाचे पालकमंत्री म्हणून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केली आहे.
ते मुळचे लातूर जिल्ह्यातील असून तिथून ते गोंदियाचा कारभारावर नजर ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील प्रश्नांची गांर्भियता कळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.