Bacchu Kadu : प्रहार-शिवसेना युती सरसकट नाहीच, फक्त एका प्रभागात एकत्र

Prahar–Shivsena alliance only in one ward : बच्चू कडूंनी एका प्रभागासाठी युती केली, मशाल चिन्ह वापरणार

Akola महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एकच दिवस शिल्लक असतानाच शिवसेना (ठाकरे गट) आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये युती जाहीर झाली. मात्र ही युती सध्या तरी जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ पुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य प्रभागांबाबत चाचपणी सुरू असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच २ जानेवारी रोजी याबाबतचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाने शहरातील विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली होती. त्यातूनच प्रहार महापालिका निवडणुकीत सक्रियपणे उतरणार असल्याची चिन्हे दिसत होती. मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आला असतानाच, आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) ने आपला जुना मित्र पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होऊन प्रारंभी एका प्रभागापुरती युती निश्चित करण्यात आली.

Akola Municipal Corporation Election : वंचित आघाडीचे अकोल्यात ‘एकला चलो रे’

या युतीनुसार शिवसेना (ठाकरे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असले, तरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये उमेदवाराचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ राहणार आहे. सध्या एका प्रभागातच प्रहारला सोबत घेण्यात आले असून, उर्वरित जागांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे महानगराध्यक्ष आशीष गावंडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र लढणार असले तरी उमेदवारांचे चिन्ह प्रभागनिहाय ठरवले जाईल.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) जुने शहर भागात भाजपला घेरण्याची रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी मुस्लिमबहुल भागात थेट उमेदवार न उभा करता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. आता प्रहार जनशक्ती पक्षाला सोबत घेत थेट ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याने ही रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत जुने शहर भागातून शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते. सध्या त्यापैकी केवळ एकच नगरसेवक शिवसेनेत शिल्लक असला, तरी प्रहारला सोबत घेत पक्ष सोडून गेलेल्यांसह भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Amravati Municipal Corporation Election : अमरावतीत महापरिश्रमानंतर महायुतीवर शिक्कामोर्तब

प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांनीही युतीबाबत माहिती देताना सांगितले की, शिवसेना (ठाकरे गट) सोबत युती झाली असून प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रहार निवडणूक लढवणार आहे. मात्र या प्रभागात निवडणूक चिन्ह ‘मशाल’ राहील, तर अन्य प्रभागांमध्ये प्रहारचे वेगळे चिन्ह राहणार आहे.