Prahar activists protest over poor development works : निकृष्ट विकासकामांवरून नगरपरिषदेवर संताप
Amravati अंजनगाव सुर्जी शहरातील विकासकामांतील निकृष्ट दर्जावर संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी अंजनगाव शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘शोले’ चित्रपटातील वीरूच्या स्टाईलने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या आंदोलनात प्रहार संघटनेचे १५ ते १६ कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. “शहरातील रस्ते, गटार, पाणीपुरवठा आदी कामे निकृष्ट दर्जाची होत असून, निधीचा अपव्यय केला जात आहे. या बाबत आम्ही वारंवार नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही,” असा आरोप प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
MLA Randhir Sawarkar : भाऊसाहेब फुंडकरांच्या विचारांचा स्वीकार करावा
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्ते टाकीवरून खाली उतरले. यावेळी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनीही आपल्या नाराजीची भावना व्यक्त करत प्रशासनाला जबाबदार धरले. “वारंवार मागण्या करूनही कामांचा दर्जा सुधारत नाही, त्यामुळे हे आंदोलन योग्य दिशेने गेले आहे,” असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले.