Politics Heats Up Over the Issue of Loan Waiver : कर्जमाफीवरून तापले राजकारण, मंत्र्यांवरील विधानामुळे वाद
Amravati राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी महायुती सरकारने ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर मागील वर्षभर सरकारवर प्रहार करणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू काही काळ शांत होते. मात्र, अलीकडेच भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या विषयावर राजकीय तापमान वाढले आहे.
मंत्री विखे पाटील यांनी म्हटले होते की, “शेतकरी कर्जबाजारी होतात आणि पुन्हा कर्जमाफी मागतात; हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.” त्यांच्या या विधानावर बच्चू कडू संतापले. त्यांनी थेट पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत, “शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना मंत्री याकडे दुर्लक्ष का करतात? पंतप्रधान कापसाचे दर जाहीर करतात, पण राज्यातील शेतकरी मात्र दराच्या प्रतीक्षेत आहेत,” असा सवाल उपस्थित केला.
Teacher’s constituency : शिक्षक मतदारसंघातील मतदारसंख्या घटली
याच संतापाच्या भरात कडू यांनी मंत्री विखे पाटील यांच्या वाहनावर प्रहार करणाऱ्याला “एक लाख रुपयांचे बक्षीस” जाहीर केले. एवढेच नव्हे, तर “त्यांची गाडी माझ्या हातात आली तर मी स्वतः ती फोडेन,” असे वक्तव्यही त्यांनी केले. या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर कडू यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आमदार प्रवीण तायडे हे कडू यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “कडू हे सतत चिथावणीखोर वक्तव्य करतात. विखे पाटील यांना जितके वय आहे तितका अनुभव बच्चू कडू यांना नाही. अशा वक्तव्यांनी जनतेत चुकीचा संदेश जातो.”
Nitin Gadkari : वाद्यांच्या फ्यूजनची नागपूरकरांवर ‘संगीत मोहिनी’
कडू आणि तायडे यांच्या या शब्दयुद्धामुळे जिल्ह्यात “कडू विरुद्ध तायडे” असा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि कापूस दराच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि सरकारच्या धोरणांवरून सुरू झालेला हा वाद पुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.








