Breaking

Bacchu Kadu : ‘भाजपचे झेंडे पेरले, आता आमची जमीनही घ्या!’ वाशिमच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Protest for farmers demands : गांजा-अफूची लागवड करू द्या, अन्यथा शेतमालाला भाव द्या, बच्चू कडू यांचा इशारा

Amravati/Washim “निवडणुकीत भाजपचे झेंडे पेरले, पण आता शेती संकटात सापडली आहे. सरकारला आमचं काही देणंघेणं नसेल, तर आमची जमीनच घ्या… किंवा आम्हाला गांजा व अफूची लागवड करण्याची परवानगी द्या!” अशा संतप्त शब्दांत वाशिम जिल्ह्यातील सुकळी येथील शेतकऱ्यांसह व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शासनाच्या अकार्यक्षम धोरणांवर रोष व्यक्त केला आहे.

या भागातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अपुरा पाऊस, सिंचनाचा अभाव आणि उत्पादन खर्च वाढ यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाकडून हमीभाव, सवलती, कर्जमाफी याबाबत फक्त घोषणा होतात; प्रत्यक्ष मदतीचा पत्ता लागत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

NCP Sharad Pawar group’s Allegation : भाजप महात्मा गांधींबद्दल कटुता निर्माण करतेय !

यंदाही मान्सूनची सुरुवात झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाचा अभाव आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच केलेली पेरणी वाया गेली असून, दुसऱ्यांदा पेरणी करणे परवडणारे नाही. परिणामी, शेतकरी हतबल झाले आहेत.

स्थानिक शेतकरी हरी ओम कल्याणकर म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी झेंडे फडकावले. मोठमोठी आश्वासने ऐकली. पण आता आमच्या शेतात ना पाणी, ना वीज, ना खते आहेत. शेती तोट्यात गेली आहे. मग काय करायचं?”

सुकळी गावात अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत घोषणा दिल्या. ‘गांजा लावा, अफू लावा, कर्ज तरी फिटवा’, अशा घोषणा देत त्यांनी सरकारकडून कृषी धोरणात बदल आणि प्रत्यक्ष मदतीची मागणी केली. काहींनी प्रतीकात्मकरीत्या शेतात झेंडे लावून सरकारचा निषेध नोंदवला व बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : मुलच्या बस आगाराच्या निर्मितीला मिळाली गती, मुनगंटीवारांच्या प्रयत्नांचे फलीत !

या प्रकाराबाबत प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष आणि अस्वस्थता पाहता, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अशा प्रतीकात्मक आंदोलने तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.