Prahar leader and former minister Bachchu Kadu’s big claim : प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा मोठा दावा
Amravati : महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील तणाव आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे आघाडी तुटण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. कडू यांनी माध्यमांशी बोलताना, “उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच भाजपाबरोबर केंद्रात जाऊ शकतात,” असे सूचक विधान केले आहे.
या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चांना आधीच उधाण आले आहेत. त्यात कडू यांच्या या वक्तव्यामुळे त्या चर्चांना आणखी बळ मिळाला आहे. भविष्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपसोबत दिसल्यास नवल वाटायला नको, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
Senior citizens : ‘14567’ ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर तोडगा !
कडूंचा मोठा दावा
बच्चू कडू म्हणाले, “आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपाच्या काही विधेयकांवर सहमतीसाठी भाजपाबरोबर आहेत. त्याचप्रमाणे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचीही केंद्रातील भाजप सरकारला कदाचित गरज पडेल. त्यामुळे राजकीय उलथापालथ होऊ शकते.”
गोड बोलण्याची गरज नाही
बच्चू कडू यांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. शेलार म्हणाले, “बच्चू भाऊ आमचे मित्र आहेत, पण त्यांचे हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचे आडनाव कडू आहे, गोड नाही, त्यामुळे त्यांनी गोड बोलण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
YDCC बँकेत काँग्रेसकडून काँग्रेस अध्यक्षांना होणाऱ्या विरोधाचा अर्थ काय ?
महाविकास आघाडीमध्ये तणाव
महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ठाकरे गटाने आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे विधान आघाडीतील तणाव आणि गोंधळ उघड करत असल्याचे दिसत आहे.
राजकीय भविष्याचा अंदाज
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, सध्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या महायुतीने आपली पकड घट्ट केली आहे. परंतु, बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा नव्याने मांडली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय सारीपाटावर कोणते नवे खेळ खेळले जातात, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.








