Bachu Kadu’s district bank chairmanship is also in trouble : अपात्रतेच्या संदर्भात बजावली नोटीस
Amaravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील राजकारणात डाव-प्रतिडाव रंगतदार होत आहेत. विभागीय सहनिबंधकांनी अविश्वास प्रस्तावावर मान्यता दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या संचालक पदावर संकट आले आहे. एका न्यायालयीन प्रकरणाचा आधार घेत कडू यांना अपात्र का ठरवू नये, याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू यांनी बबलू देशमुख यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राजकीय खेळी करत नियंत्रण मिळवले होते. ते स्वतः बँकेचे अध्यक्ष झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्या विरोधात सतत कारवायांचे सत्र सुरू आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार, एखादा संचालक न्यायालयीन प्रकरणात दोषी ठरल्यास तो पदावर राहू शकत नाही. नाशिक सत्र न्यायालयाने एका प्रकरणात कडू यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र, कायद्यानुसार एक वर्षाची शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा नियम आहे. याच अनुषंगाने विरोधी गटाने त्यांच्या अपात्रतेची मागणी केली आहे. त्यामुळे कडू या प्रकरणातून कसे बाहेर पडतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सहकार कायद्याच्या विविध तरतुदींनुसार अनेक कारवाया सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांना मोठा पराभव स्विकारावा लागल्यानंतर त्यांच्या ताब्यातील जिल्हा बँक काढून घेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
याच पार्श्वभूमीवर पाच संचालकांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्याच वेळी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह ११ संचालकांनी ३१ जानेवारी रोजी विभागीय सहनिबंधकांकडे एक अर्ज दाखल केला.
Devendra Fadanvis : मुलभूत सेवा काय असते, हे समजून घेण्यासाठी आनंदवनलाच यावं लागेल !
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३(क) अन्वये बच्चू कडूंना अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली. विभागीय सहनिबंधकांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी कडूंना नोटीस बजावण्यात आली.
या नोटीसमध्ये, ते सकृतदर्शनी अपात्र ठरत असल्याचे नमूद करत, संचालक पदावरून का काढून टाकू नये, असा सवाल करण्यात आला आहे. कडूंना २४ फेब्रुवारीपर्यंत याबाबत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.