Relief to Bachhu Kadu group by supreme court : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालकाच्या अविश्वास प्रस्तावनावर दिलासा
Amravati : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष बच्चू कडू यांच्या गटातील पाच संचालकांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी गटाने केली होती. मात्र, कडू गटाने न्यायालयात धाव घेत यावर स्थगिती मिळवली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाकडून अपात्रतेसंबंधी नोटीस मिळाली आहे. त्यावर २४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, बँकेच्या कारभारावर वर्चस्व मिळवण्यासाठी विरोधकांनी १४ फेब्रुवारीला कडू गटातील पाच संचालकांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला होता.
बच्चू कडू यांनी विरोधी गटाच्या या हालचालींना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत, १४ फेब्रुवारीच्या सभेवर स्थगिती दिली आहे. यामुळे बच्चू कडू गटाला दिलासा मिळाला आहे. तर विरोधी गटाला धक्का बसला आहे.
या निर्णयामुळे जिल्हा बँकेतील राजकीय वातावरण तापले आहे. बच्चू कडू यांच्या गटाकडे संख्याबळ असल्याचा दावा समर्थक करत आहेत. मात्र विरोधक अद्यापही नव्या रणनीतीवर विचार करत असल्याचे समजते. सहकार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अविश्वास प्रस्ताव जरी मंजूर करण्याचा प्रयत्न झाला असता, तरी तो यशस्वी झाला नसता.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे, कडू गट काही काळासाठी सुरक्षीत झाला, असे वाटत आहे. मात्र तरीही जिल्हा बँकेतील हा राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. पुढील काळात काय घडते, याकडे जिल्ह्यातील सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.