Sarpanch of four villages went on hunger strike : रस्त्याच्या दुरवस्थेवर ठेवले बोट; प्रशासनाचे दुर्लक्ष
Buldhana Chikhli तालुक्यातील शेळगाव आटोळ-इसरुळ-बायगाव रस्त्याची दयनीय स्थिती झाली आहे. तसेच कामातही दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अखेर चार गावांच्या सरपंचांनी सामूहिक उपोषण सुरू केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही महिने उलटले, मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
शेळगाव आटोळ-इसरुळ-बायगाव आणि देऊळगाव घुबे-शेळगाव आटोळ या रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था आहे. रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातांची मालिका सुरू आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी त्रस्त आहेत. काम मंजूर होऊनही अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. त्यांच्यासोबत इसरुळचे सरपंच सतीश भूतेकर, शेळगाव आटोळचे सरपंच संतोष बोर्डे आणि मिसाळवाडीचे सरपंच बाळू मिसाळ आहेत. त्यांनी १७ फेब्रुवारीपासून मंगरूळ फाटा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, निधीच्या अभावामुळे हे काम रखडले आहे. आंदोलकांना १५ फेब्रुवारी रोजीच याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आंदोलनानंतर २५ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन विभागाने दिले असून, उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार? निधीचा प्रश्न सोडवून ग्रामस्थांना दर्जेदार रस्ता कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.