More than seven thousand couples get united : ‘भरोसा’सेलने सावरली सात हजारांहून अधिक कुटुंब
Nagpur लग्न झाल्यानंतर मुलीच्या संसारात माहेरच्या मंडळींचा अतिहस्तक्षेप, सासरच्या मंडळींना नवख्या सुनेकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा. या गोष्टी आज समाजात खूपच कॉमन झाल्या आहेत. आपण घरोघरी मातीच्या चुली म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरात काहीतरी सुरूच असतं. अशात नवरा-बायकोमध्ये ठिणगी पडली की विषय अगदी घटस्फोटापर्यंत जातो. मध्यस्थींचे ऐकले जात नाही, मोठ्यांचे ऐकले जात नाही. विषय एवढा टोकाला जातो की म्युच्युअल घटस्फोटालाही Mutual Divorce दोघे तयार होतात. पण यात भरोसा सेल अत्यंत महत्त्वाची जबाबदारी निभावत असते. गेल्या काही वर्षांमध्ये हजारो जोडप्यांची संसाराची विस्कटलेली घडी बसवून देण्यात भरोसा सेलला यश आलं आहे.
भरोसा सेलमध्ये समूपदेशनानंतर अनेकांचे संसार सुरळीत आले आहेत. कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरण, अनैतिक संबंध कौटुंबिक हिंसाचार आणि वैवाहिक जीवनात आलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली. गेल्या आठ वर्षांत १६ हजार ८४३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १५ हजारांवर तक्रारी यशस्वीपणे सोडविण्यात आल्या. तर दुभंगलेल्या ७ हजार १७२ दाम्पत्यांचा विस्कळीत झालेला संसार भरोसा सेलने पुन्हा रुळावर आणला आहे.
शहरात बलात्कार, विनयभंगासह कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ, शारीरिक व मानसिक छळ, विवाहबाह्य संबंध आणि प्रेमसंबंधातून घरगुती स्वरुपांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. अशा तक्रारींमुळे पोलीस ठाण्यात गु्न्ह्यांचे प्रमाण वाढत होत तसेच आरोपींचीही संख्या वाढत होती. कौटुंबिक तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी योग्य त्या प्रमाणात प्रयत्न होत नसल्यामुळे तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांनी गुन्हे शाखेच्या अंतर्गत २०१७ मध्ये भरोसा सेलची स्थापना केली.
Zilla Parishad Nagpur : आमचे सेटिंग नव्हते म्हणून निधी मिळाला नाही !
तेव्हापासून कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वाद-विवादाच्या तक्रारींची नोंद भरोसा सेलमध्ये करण्यात येत आहे. गेल्या आठ वर्षांत भरोसा सेलमध्ये १६ हजार ८४३ तक्रारींची नोंद करण्यात आली. या तक्रारींपैकी १५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबियांचे भरोसा सेलकडून समूपदेशन करण्यात आले. अनेक दाम्पत्यांचा विस्कळीत झालेला संसार पुन्हा रुळावर आला आहे. भरोसा सेलमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येसुद्धा घट आली आहे. तुटण्याच्या काठावर असलेला संसारसुद्धा पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा थाटल्या जात आहेत.








