Former MLA alleges trustees were changed overnight : रातोरात विश्वस्त बदलल्याचा माजी आमदाराचा आरोप
Akola शहरातील नामवंत शैक्षणिक संस्था भारतीय सेवा सदनच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीवर वादाचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. ही निवडणूक नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीने राबवण्यात आली आहे. रातोरात नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली, असा गंभीर आरोप संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे.
बाजोरिया म्हणाले, “नवीन मंडळात आम्हा सात विश्वस्तांना डावलण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य आहे. आम्ही लवकरच उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागणार आहोत.” राधादेवी गोयनका यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली भारतीय सेवा सदन ही संस्था आज शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून आहे. मात्र संस्थेतील सध्याच्या घडामोडीमुळे अंतर्गत वाद समोर आले आहेत.
बाजोरिया पुढे म्हणाले, “नियमभंग करून राबवलेली निवडणूक ही धर्मदाय आयुक्त कार्यालयानेही प्रोव्हिजनल मान्यतेस नाकारली आहे. त्यामुळे नव्याने निवडलेले विश्वस्त काम पाहणार की जुन्या विश्वस्त मंडळालाच वैधता मिळणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”
यावर तोडगा निघेपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा, तसेच नवीन मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी राजकुमार रुंगटा, दीपक अग्रवाल, डॉ. वंदन मोहोड, ॲड. रमेश श्रावगी उपस्थित होते.
या प्रकरणावर संस्थाध्यक्ष दिलीपराज गोयनका यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. उपाध्यक्ष भरतराज गोयनका यांनी देखील “मी सध्या नागपूरमध्ये राहतो,” असे सांगून प्रतिक्रिया टाळली.
Gondia Zilla Parishad : पदोन्नती नाकारलेले पुन्हा यादीत; शिक्षण विभागावर नियमभंगाचा आरोप!
“संस्थेतील प्रत्येक सदस्याला एकच मताचा अधिकार असावा. त्यासाठी जुने व कालबाह्य उपनियम (बायलॉज) बदलून नवीन मतदार यादी तयार केली जावी. नंतर निवडणूक नियमाप्रमाणे पार पाडावी,” अशी मागणी बाजोरिया व अन्य विश्वस्तांनी केली असून, ते लवकरच हायकोर्टात जाणार असल्याचेही स्पष्ट केले.