Bacchu kadu’s trusted leader joins NCP : शेकडो कार्यकर्त्यांसह अरविंद पाटील अजित पवार गटात, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती
Akola जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेश होताच त्यांची नियुक्ती राष्ट्रवादीच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून ‘इनकमिंग’ला गती मिळाली आहे. जून महिन्यात अजित पवार गटातर्फे अकोल्यात मोठा पक्षप्रवेश मेळावा घेण्यात आला होता. त्यानंतर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसने संघटन विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे.
Maharashtra Politics : समज देऊन सोडा, मंत्र्यांना सवलत, जनतेला शिक्षा !
पक्षप्रवेश सोहळ्यात प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार अमोल मिटकरी, किसान सभेचे राज्यप्रमुख ॲड. वसंतराव मनकर, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा यांची उपस्थिती होती. अरविंद पाटील यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात पीक कर्जमाफीच्या मागणीसाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे आंदोलन सुरू आहे. २४ जुलै रोजी प्रहारतर्फे जिल्ह्यात सहा ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. त्यात आता राष्ट्रवादीत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. यामुळे आता अर्थ व कृषी खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने किसान सभा कर्जमाफीसाठी पुढाकार घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सन २०१४ पासून आतापर्यंत महाविकास आघाडी व महायुती सरकारकडून तीन कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, अटी, निकष आणि दस्तावेजांच्या अडचणीमुळे ८१ हजार ३३५ शेतकरी लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे यापुढील कर्जमाफी विना अट व निकषांवर आधारित असावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Mahavitaran : विदर्भात १००७ वीजवाहिन्यांचे विलगीकरण, ७२७ उपकेंद्रांचे सक्षमीकरण अंतिम टप्प्यात
दरम्यान, अकोल्यात प्रहार पक्षाचे बळ पूर्वीच्या तुलनेत घटले आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अकोल्याचे पालकमंत्रीपद प्रहारचे बच्चू कडू यांच्याकडे होते. त्या काळात पक्षप्रवेशाचे प्रमाण मोठे होते. २०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्फूर्ती निखिल गावंडे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर प्रहारमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढतच गेली आहे.








