Sharad Pawar’s harsh allegations against NDA over Bihar election results : निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा, अन्यथा लोकशाहीचा विश्वास डळमळेल
Baramati – Pune : बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयामागील एक सोपे पण धक्कादायक गणित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उघड केले. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेनंतर जे घडलं, तेच बिहारमध्ये पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांनी थेट १० हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा केले आणि महिलांनीच प्रत्यक्ष निवडणूक हातात घेतली. आजचे परिणाम त्याचाची साक्ष देत आहेत, असे शरद पवार बिहारच्या निवडणूक निकालानंतर म्हणाले.
बारामतीतील गोविंदबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या विधानाने निवडणूक प्रक्रियेत थेट पैशाच्या हस्तक्षेपाने मतदारांचे कल पालटणे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पवारांनी स्पष्ट शब्दांत टीका केली की, ज्या पद्धतीने राज्य सरकारनी ‘कॅश ट्रान्स्फर’वर आधारित निवडणूकपूर्व योजना राबवल्या, त्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहेत.
पवार म्हणाले, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आम्ही नेहमीच आदर करतो. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड निधी थेट खात्यात टाकणे म्हणजे मतदारांच्या निवडीवर थेट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. अशा उपाययोजना निवडणूक प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडवू शकतात. पवारांनी निवडणूक आयोगाला थेट सुनावत म्हटले की, अशा प्रकारच्या योजनांचा योग्यवेळी आढावा घ्यावा, कारण “उद्याच्या निवडणुकीत जर पक्षांनी अशा पद्धतीने पैसा वाटायला सुरुवात केली, तर लोकशाही प्रक्रियेचीच थट्टा होईल.
जाणकार, अर्थतज्ज्ञ आणि निवडणूक आयोग यांना या मॉडेलचे मूल्यमापन करण्याचे आवाहन पवारांनी केले. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा राजकीय परिणाम अद्याप चर्चेत असतानाच, बिहारमधील या निवडणुकीने कल्याणकारी योजना की निवडणूक युक्ती, हा प्रश्न पुन्हा तीव्र केला आहे. पवारांच्या वक्तव्यानुसार, थेट खात्यात पैसा हा महिलांसाठी दिलासा असला, तरी निवडणूक तत्त्वनिष्ठतेसाठी तो धोका बनू शकतो.
सध्याच्या राजकीय वातावरणात पवारांचे हे वक्तव्य केवळ टीका नाही, तर येणाऱ्या निवडणुकांसाठी राजकीय वॉर्निंग बेल आहे. पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी पैशाचा वापर सुरुच ठेवला, तर लोकांचा निवडणुकीवरील विश्वास कोसळण्याचा धोका पवारांनी स्पष्ट केला.








