Green signal for night landing in Gondia : बिरसी विमानतळावरील समस्या सुटणार; अधिकृत परवानगी मिळाली
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावर आता रात्रीच्या वेळेसही विमान उतरवणे शक्य झाले आहे! इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, डीजीसीएने ऑल वेदर ऑपरेशन (IFR) ला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी दृश्यतामान, पाऊस, धुके किंवा वाईट हवामान असतानाही विमानांची सुरक्षित लँडिंग शक्य होणार आहे. गोंदियाचा हा मोठा टप्पा हवाई विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे!
पूर्वी बिरसी विमानतळावर आयएलएस प्रणाली होती, परंतु काही कारणांमुळे ती बंद करण्यात आली होती. परिणामी, रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात विमान लँडिंग करणे मोठे आव्हान ठरले होते. मात्र, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने ही अत्याधुनिक प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.
इतकेच नाही, तर लवकरच कैट-1 अॅप्रोच लायटिंग सिस्टम बसवली जाणार आहे. यामुळे केवळ ८०० मीटर दृश्यतामानातही विमान सुरक्षित लँडिंग करू शकतील. याशिवाय, धावपट्टीचा विस्तार करण्यात आला आहे. प्रवासी विमानसेवा सुरू करण्यास विमान कंपन्यांना मोठी मदत होणार आहे.
बिरसी विमानतळावर नाइट लँडिंग आणि नवीन तांत्रिक सुविधा कार्यान्वित झाल्यावर गोंदियातून मोठ्या प्रवासी विमानसेवांची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात विदर्भातील पर्यटन, उद्योग आणि व्यापारी क्षेत्रासाठी हे सुवर्णसंधी ठरेल. आता गोंदियाचा हवाई प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.