BJP convention in Shirdi : महाअधिवेशनाची तयारी; गडकरी, फडणवीस उद्या येणार
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली आहे. १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद या महाअधिवेशनातून करण्यात येणार आहे. या महाअधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी नागपुरातून शनिवारी रवाना झाले. विधानसभा निवडणुकीअगोदर पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधून विधानसभेचे रणशिंग फुंकण्यात आले होते. आता शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा शंखनाद होईल. या महाअधिवेशनाला १५ हजारांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तालुका महामंत्रीदेखील या महाअधिवेशनाला बोलविण्यात येतील.
CM Devendra Fadnavis : मेयो-मेडिकलमधील कामांच्या देखरेखीसाठी वॉर रूम
या महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिर्डीतच पक्षाची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील होणार आहे. यासाठी प्रत्येक विभागातून सर्वच प्रमुख पदाधिकारी शिर्डीत पोहोचणार आहेत. अगदी तालुका पातळीवरील पदाधिकारीदेखील यात सहभागी होणार आहेत. शनिवारी नागपुरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते समृद्धी महामार्गावरून शिर्डीच्या दिशेने रवाना झाले.
यात प्रामुख्याने संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम, संजय भेंडे, माजी आमदार गिरीश व्यास इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच आमदारदेखील तेथे पोहोचणार आहेत. या महाअधिवेशनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या प्रचारालाच अप्रत्यक्षपणे सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे या महाअधिवेशनातील नियोजनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?
महाअधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष
शिर्डीमधील भाजपचे महाअधिवेशन विविध कारणांनी विशेष आहे. कारण राज्यात जबरदस्त बहुमतासह सरकार स्थापन झाल्यानतंर भाजपचं हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचा मुख्य अजेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते काय मार्गदर्शन करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.