Bhai Jagtaps claim, differences with MNS remain, Sachin Sawant : भाई जगतापांचा दावा, मनसेशी मतभेद कायम : सचिन सावंत
Mumbai : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठं राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंशी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र लढणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे.
भाई जगताप यांनी म्हटलं, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना देखील स्पष्ट सांगितलं होतं की, आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह किंवा राज ठाकरेंच्या मनसेसोबत लढणार नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात, अशी आमची मागणी आहे.”87 आय
ते पुढे म्हणाले, “राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका मांडली. उद्धवजींसोबत जाणं योग्य नाही आणि राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. शिवसेना आता दोन गटात विभागली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनाच ठरवू द्यावं की, कोणासोबत लढायचं.”
Bacchu Kadu : याची बायकोच याच्या संघटनेत राहू शकत नाही; बच्चू कडूंनी डिवचले
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “आमची बैठक चेन्निथला यांच्यासोबत झाली आणि आम्ही आमची मतं स्पष्टपणे मांडली आहेत. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत. त्यामध्ये कोणतीही शंका नाही. प्रत्येक नेत्याची भूमिका हायकमांडने ऐकून घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते सर्व पक्षांशी चर्चा करून घेतील.”
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी आपली राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र भाई जगताप यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या संभाव्य मित्रपक्षांमध्ये नवे तणाव उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
_____