BMC Election 2026: निवडणूक आयोगाने ‘पाडू’ मशीन आणल्याचा आरोप

Raj Thackerays strong attack, claiming that campaign practice broken : प्रचाराची प्रथा मोडल्याचा दावा करत राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असताना मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट आरोप करत सरकारच्या सोयीसाठी आयोग काम करत असल्याचा दावा केला आहे. प्रचाराची ठरलेली प्रथा मोडून मतदानाच्या आदल्या दिवशी घराघरात प्रचाराला मुभा देण्यात आली असून यामागे सत्ताधाऱ्यांना फायदा करून देण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते. त्यानंतर दोघेही मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होणार असताना माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली. प्रचाराचा अधिकृत कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपला असताना, त्यानंतरही उमेदवारांना घराघरात जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली, हा निर्णय अत्यंत संशयास्पद असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

Election Guidelines : दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचा ‘रामबाण’ उपाय; आता दाखवावी लागणार २ ओळखपत्रे!

आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आधी एक दिवस शांततेचा असायचा, मात्र यावेळी ही परंपरा मोडण्यात आली असल्याचं ते म्हणाले. पत्रकं वाटता येत नाहीत, पण पैसे वाटता येतात का, असा थेट सवाल करत ही मुभा आताच का दिली, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. सरकारला ज्या सुविधा हव्यात त्यासाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी काही अधिकारी कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नसल्याचंही सांगितलं. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप सुरू असून त्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं, असं आवाहनही त्यांनी केलं. काही ठिकाणी नागरिक याला विरोध करत असल्याचं समाधानकारक चित्र असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने ‘पाडू’ नावाचं नवीन मशीन आणल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात PADU असं या मशीनचं नाव असून ईव्हीएम बंद पडल्यास हे मशीन वापरलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अशा महत्त्वाच्या मशीनबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्याची माहिती आधी का दिली नाही, राजकीय पक्षांना हे मशीन दाखवण्याची गरजही का वाटली नाही, यात गडबड होणार नाही याची खात्री कशी देता येईल, असा सवाल करत त्यांनी ही कुठली बेबंदशाही आणि कसली लोकशाही आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

Murlidhar Mohol on Ajit Pawar : आरोप सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्त होईन

निवडणूक आयोग सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आहे का, असा थेट सवाल करत राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. काय प्रकारचं राजकारण सुरू आहे हे जनतेने समजून घ्यायला हवं, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली. मतदानाच्या तोंडावर घेतलेले हे निर्णय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आपला हल्लाबोल कायम ठेवला.