BMC election : ६३ जागांची मागणी करूनही वंचितकडून १६ जागांवर उमेदवारच नाहीत

Big blow to Vanchit alliance, Congress’s problems increase : वंचितच्या युतीला मोठा धक्का, काँग्रेसच्या अडचणी वाढल्या

Mumbai : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला मोठा धक्का बसल्याचे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट झाले आहे. जागावाटपात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून ६३ जागांची मागणी केली. त्यानुसार काँग्रेसने मोठ्या विश्वासाने ६२ जागा वंचितला देऊ केल्या. मात्र प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीला यापैकी १६ जागांवर उमेदवारच उभे करता आले नसल्याने या जागांवर उमेदवारी अर्जच भरले गेले नाहीत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यंदा मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात युती झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती टिकवण्यासाठी नमते घेत वंचितला ६२ जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काँग्रेस १५० जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंचितने त्यांच्या वाट्याला आलेल्या ६२ पैकी केवळ ४६ जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे.

Municipal election : आठवलेंची ‘मैत्रीपूर्ण’ बंडखोरी भाजपने देऊ केलेल्या सात जागा नाकारल्या

मुंबईत वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याने अनेक प्रभागांमध्ये योग्य उमेदवारच मिळाले नसल्याचे कारण पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे १६ जागांवर उमेदवार नसल्याची माहिती असूनही वंचितकडून याबाबत काँग्रेसला वेळेत कळवण्यात आले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच काँग्रेसला याची कल्पना देण्यात आल्याने या १६ जागांवर काँग्रेसलाही आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवण्याची संधी मिळाली नाही.

विशेष म्हणजे या १६ जागांपैकी काही प्रभागांमध्ये काँग्रेसची पारंपरिक आणि मजबूत ताकद आहे. तरीही युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठ्या मनाने या जागा वंचितला सोडल्या होत्या. मात्र वंचितकडून त्या जागांवर उमेदवारी अर्जच न भरल्याने आता काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. परिणामी या प्रभागांमध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची नामुष्की पक्षावर येण्याची शक्यता आहे.

Akola Municipal Corporation Elections : नेत्यावर शब्द फिरवल्याचा आरोप करत महिला बेशुद्ध

आता या १६ जागांवर अधिकृतपणे काँग्रेस उमेदवार उभे करू शकत नसले तरी जिथे शक्य असेल तिथे बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. १९९९ नंतर प्रथमच काँग्रेस राज्यातील महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वबळावर लढत असून मुंबईत १६७, ठाण्यात १०१, पुण्यात १००, पिंपरी-चिंचवडमध्ये ६० आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १०० जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे.
नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरली आहे.

लातूर महापालिकेत पाच जागा वंचितला सोडण्यात आल्या असून उर्वरित सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. नांदेडमध्ये २० जागा वंचितला देण्यात आल्या असून बाकी सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. मात्र मुंबईतील १६ जागांचा पेच युतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत असून या गोंधळाचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

___