Mahayuti seat-sharing formula almost finalized : महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित
Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अखेर ठोस दिशा मिळाल्याचे संकेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, एकूण २२७ प्रभागांपैकी भाजप १४० तर शिंदे गटाची शिवसेना ८७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजप आणि शिवसेना मिळून सर्व २२७ जागा लढवतील, असे चित्र स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जागावाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेत बैठकींच्या फेऱ्या सुरू होत्या. सुरुवातीला भाजपने शिंदे गटासाठी केवळ ५२ जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलल्याने भाजपने शिवसेनेला अधिक जागा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती. त्यानुसार आता १४०-८७ असा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जात आहे.
municipal elections : महाराष्ट्रात दोन नव्हे तर तिसऱ्या आघाडीची नांदी?
दरम्यान, या जागावाटपावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडून अद्याप मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने सध्या ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि पनवेल या महापालिकांमधील जागावाटपावरही अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, हे सर्व पेच लवकरच सुटतील, असा दावा भाजपमधील सूत्रांकडून केला जात आहे.
Maharashtra politics : आयातांचा बोलबाला मात्र निष्ठावंतांची उपेक्षा !
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ प्रभागांसाठी मतदान होईल. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर तेव्हापासून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात होईल चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक
२०१७ मध्ये झालेल्या मागील मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४, भाजपने ८२, काँग्रेसने ३१, राष्ट्रवादी काँग्रेसने ९, मनसेने ७, समाजवादी पक्षाने ६, एमआयएमने २ तर अपक्षांनी ५ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या महापौर होत्या. आता २०२६ च्या निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला मुंबईच्या राजकारणात काय बदल घडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








