BMC Mayor : आरक्षणाच्या त्या नियमामुळे भाजपचे स्वप्न धोक्यात!

 

Why Thackeray faction chances of becoming mayor in Mumbai increase : मुंबईत ठाकरे गटाचाच महापौर होण्याच्या शक्यता का बळवल्या?

Mumbai : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी महापौर पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचली आहे. एका नियमामुळे, एका सोडतीमुळे भाजप-शिंदे महायुतीच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ शकतो आणि थेट ठाकरे गटाचा महापौर निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 असे एकूण 118 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर आमचाच होणार, असा दावा महायुतीतील दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. मात्र महापौर पदावर भाजप ठाम असताना, शिंदे गटानेही हेच पद हवे असल्याची भूमिका घेतल्याने अंतर्गत चर्चा आणि दबावाचे राजकारण सुरू आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आता आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.

PMC Mayor Race : पुणे महापौरपदासाठी ‘ओबीसी पुरुष’ आरक्षणाची दाट शक्यता; भाजपमध्ये हालचालींना वेग!

येत्या 22 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. यंदा महापौर पदासाठी आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित केले जाणार असून, याच पद्धतीमुळे महायुतीची अडचण वाढू शकते.

जुन्या किंवा नव्या चक्राकार पद्धतीनुसार जर मुंबईचे महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या नगरसेवक संख्येनुसार महायुतीकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातून एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. उलट ठाकरे गटाचे दोन नगरसेवक या प्रवर्गातून निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी आणि प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे हे दोघेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक आहेत.

Mayor of Mumbai : 31 जानेवारीला मुंबईचा महापौर निवडण्याची शक्यता

अशा परिस्थितीत, बहुमत असूनही महायुतीला महापौर पदासाठी उमेदवार देता येणार नाही आणि नियमांनुसार ठाकरे गटाचा महापौर निवडून येऊ शकतो. यामुळे भाजपचे मुंबईत आपला महापौर बसवण्याचे स्वप्न चक्काचूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या चक्राकार पद्धतीनुसार जर अनुसूचित जाती किंवा इतर राखीव प्रवर्गासाठीही आरक्षण गेले, तरी महायुतीची कोंडी होऊ शकते, कारण या प्रवर्गातूनही त्यांचा ठोस पर्याय उपलब्ध नसल्याची चर्चा आहे.

PMC Mayor Race : पुणे महापौरपदासाठी ‘ओबीसी पुरुष’ आरक्षणाची दाट शक्यता; भाजपमध्ये हालचालींना वेग!

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर सलग 25 वर्षे सत्ता होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ‘देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल’ असे विधान केले होते. आरक्षणाच्या संभाव्य समीकरणांमुळे उद्धव ठाकरे यांना आधीच या शक्यतेची कल्पना असल्यानेच हे वक्तव्य आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आता सर्वांचे लक्ष 22 जानेवारीच्या आरक्षण सोडतीकडे लागले असून, त्या एका चिठ्ठीवर मुंबईचा पुढील महापौर कोणाचा असणार, हे ठरणार आहे. संख्याबळ असूनही महायुती सत्तेपासून दूर राहणार की ठाकरे गटाला अनपेक्षितपणे महापौर पद मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

___