Bomb threat to post and passport offices; buldhana police scrambled : सायनॉइड-आरडीएक्सचा ई-मेल; तपासणीनंतर अफवा ठरली खोटी
Buldhana राज्यातील पासपोर्ट व टपाल कार्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या ई-मेलमुळे बुधवारी बुलढाण्यात मोठी खळबळ उडाली. नागपूर विभागीय टपाल कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल तातडीने बुलढाण्यासह इतर जिल्ह्यांना पाठविण्यात आला. माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सदर ई-मेलमध्ये २५ मार्च रोजी दुपारी १२.१० वाजता राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयांमध्ये सायनॉइड विषारी वायूसह १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. या गंभीर स्वरूपाच्या धमकीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.
Crime News: प्रियकराच्या संशयातून संतप्त प्रेयसीने मैत्रिणींसह घरात घुसून तरुणीचे केस कापले !
बुलढाणा येथील टपाल कार्यालयाला हा ई-मेल थेट न आल्यानेही विभागीय कार्यालयाकडून सूचना मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. त्यानंतर प्रभारी ठाणेदार युवराज रबडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बॉम्बशोधक पथक व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पोस्ट कार्यालय परिसरात तसेच इमारतीत सखोल तपासणी करण्यात आली. प्रत्येक कोपरा तपासून पाहण्यात आला, मात्र कोणतेही स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
त्यामुळे अखेर हा ई-मेल केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. या घटनेमुळे काही काळ टपाल कार्यालयातील कामकाजावर ताण निर्माण झाला होता. कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.
पोस्टमास्तर आशिष इंगळे यांनी सांगितले की, विभागीय कार्यालयाकडून सकाळी ११ वाजता ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली. सध्या कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रभारी ठाणेदार युवराज रबडे यांनी सांगितले की, “डाक विभागाकडून माहिती मिळताच तातडीने बॉम्बशोधक व श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. कोणताही धोका आढळलेला नाही. या संदर्भातील सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.”








