व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana Congress : काँग्रेसमधील खांदेपालट कधी? जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा ऊत

Buldhana Congress : काँग्रेसमधील खांदेपालट कधी? जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा ऊत

congress district president name yet to declared : प्रवेश, संपर्क यात्रा आणि युवा नेतृत्वाच्या शोधामुळे बुलढाण्यात राजकीय उत्सुकता

Buldhana मार्च महिन्याच्या प्रारंभी काँग्रेसने विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्यांची सुरुवात कोकणातून करत संघटन पुनर्बांधणीचा स्पष्ट संदेश दिला होता. त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हास्तरावरील कार्यकारिणीत बदल आणि संभाव्य खांदेपालटाचे संकेत दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस राजकारणात चर्चांना उधाण आले होते.
या घडामोडींनंतर उद्धवसेनेतील एका प्रभावी नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणांना वेग आला. या नेत्याचे नाव जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. प्रवेशानंतर त्यांनी जिल्हाभर संपर्क यात्रा सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेत पक्षप्रवेशांची चढाओढ; गायकवाड-जाधव गटात अदृश्य स्पर्धा

काँग्रेसची ‘जोशसोबत होश’ ही भूमिका कायम ठेवत पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी नव्याने दाखल झालेल्या नेतृत्वाची नेमकी किती परिणामकारक भूमिका ठरेल, याबाबत सध्या राजकीय पातळीवर अंदाज बांधले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चेहरा पक्षासाठी किती उपयुक्त ठरेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्षही पक्षबदलाच्या तयारीत असल्याची चर्चा काही माध्यमांत रंगली होती. मात्र त्याचे अपेक्षेप्रमाणे अधिकृत खंडन झाल्याने या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळाला. तरीही, जवळपास महिनाभर उलटूनही जिल्हाध्यक्ष बदलाचा निर्णय प्रलंबितच असल्याने खांदेपालटाचा मुद्दा मागे पडला की काय, अशी कुजबुज पुन्हा सुरू झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, काँग्रेस श्रेष्ठी सध्या जिल्ह्यातील गटबाजी, संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुकांतील समीकरणांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. त्यामुळे घाईघाईने निर्णय न घेता दमदार युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या पर्यायावर गंभीर विचार सुरू असू शकतो.

Electrical distribution transformer : डीपी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप; शेतकऱ्यांचा प्रशासनावर संताप

सध्या सुरू असलेल्या पदयात्रा आणि संपर्क मोहिमेनंतर जिल्हाध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बुलढाणा काँग्रेसमधील पुढील राजकीय हालचालींकडे कार्यकर्त्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!