Allegation of abusive behavior against the district president : राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष; अनुजा सावळेंचा राजीनामा गाजतोय
Buldhana राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा महिला अध्यक्ष अनुजा सावळे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर अपमानास्पद वागणुकीचे आरोप करत सोशल मीडियावर पत्र प्रसिद्ध केले.
दुसरीकडे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी एक व्हिडीओ जारी करून अनुजा सावळे यांना पक्षातूनच निष्कासित केल्याचा दावा केला आहे. याआधी १८ डिसेंबर २०२४ रोजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अनुजा सावळे यांना पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपावरून निलंबित केले होते. हा निर्णय ॲड. काझी यांच्या तक्रारीवरून घेतल्याचे समजते.
अनुजा सावळे यांनी आपल्या राजीनाम्यात पक्षात अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी लिहिले की, “मराठा समाजातील एक सक्षम महिला असूनही मला पक्षात वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती.” विशेष म्हणजे, १९ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या राजीनाम्याची त्यांनी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सोशल मीडियावर घोषणा केली.
अनुजा सावळे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, ४ फेब्रुवारी रोजीच ॲड. नाझेर काझी, प्रदेश उपाध्यक्ष टी. डी. अंभोरे आणि आमदार मनोज कायंदे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून अनुजा सावळेंच्या पक्षातून निष्कासनाची मागणी केली.
Ladki Bahin Scheme : नियम कठोर झाले, पण बहिणी आत्मनिर्भर झाल्या!
या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) गटातील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, पक्षातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अनुजा सावळे यांच्या राजीनाम्यानंतर आता जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटातील सावळे यांचे समर्थक आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचे समर्थिक सरसावले आहेत. आराेप प्रत्याराेपाच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, येत्या काही दिवस या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरू राहणार आहे.