Buldhana NCP Groups Reunion Updates : दुःखाच्या प्रसंगी राष्ट्रवादीचे ‘मनाचे विलीनीकरण’; बुलढाण्यात दोन्ही गट आले एकत्र

ncp-factions-reunite-in-buldhana-for-ajit-pawar-asthi-kalash-darshan : स्व. अजितदादांच्या अस्थिकलश दर्शनासाठी शिंगणे आणि कायंदेंचे संयुक्त आवाहन

Buldhana राजकारणातील मतभेद आणि टोकाचा संघर्ष बाजूला ठेवत बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी ‘मनाच्या विलीनीकरणा’चा प्रत्यय दिला आहे. दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदललेले पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, ज्या सिंदखेड राजा मतदारसंघात पवार गट आणि दादा गट एकमेकांविरोधात शड्डू ठोकून होते, तिथलेच प्रमुख नेते डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार मनोज कायंदे यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आवाहन केल्याने संपूर्ण राज्यात या ‘समन्वया’ची चर्चा रंगली आहे.

अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना बुलढाण्यात मात्र एक वेगळीच सकारात्मक परंपरा पाहायला मिळाली. सिंदखेड राजा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार मनोज कायंदे हे सध्या एकाच व्यासपीठावर येऊन दादांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Nashik Municipal Corporation Mayor Election Twist : नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप! भाजपला डावलून शिंदेंच्या शिवसेनेचे महापौरपदासाठी अर्ज

बुलढाण्यातील शोकसभेत आमदार कायंदे भावूक झाले असताना डॉ. शिंगणे यांनी त्यांना सावरणे असो, किंवा डॉ. शिंगणे यांच्या उद्विग्नतेवर आमदार कायंदे यांनी दिलेला शब्दांचा आधार असो, या दोन्ही नेत्यांमधील ‘बॉडी लँग्वेज’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी काढण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टवर डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, ॲड. नाझेर काझी आणि नरेश शेळके या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची नावे एकत्र झळकली आहेत.

या संयुक्त आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. राजकीयदृष्ट्या हे विलीनीकरण होईल की नाही, हे भविष्यात ठरेल; मात्र सध्या तरी हे दोन्ही गट एकाच विचारधारेने आणि भावनेने एकत्र आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Mira Bhayandar Mayor Dimple Mehta Protest : मिरा-भाईंदरमध्ये मराठी महापौरासाठी रणकंदन; डिंपल मेहतांच्या निवडीविरोधात धडक मोर्चा

बुलढाणा जिल्ह्याने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, राजकारण हे केवळ सत्तेपुरते मर्यादित नसून, कठीण प्रसंगी मानवी नाते आणि सामूहिक आदर हा अधिक महत्त्वाचा असतो. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने एकत्र येऊन अस्थिकलश दर्शन यात्रेचे नियोजन करत आहेत, ते पाहता ‘मनाचे विलीनीकरण’ आधीच झाल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मैत्रीपूर्ण हालचालींचे काय परिणाम होतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.