fake currency worth 8 lakh 83 thousand found : नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला
Buldhana बनावट नाेटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना पुण्यातील दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. त्यांच्याकडून पाेलिसांनी ८ लाख ८३ हजार रुपयांच्या बनावट नोटा, एका चारचाकी वाहन जप्त केले. या बनावट नोटा जिल्ह्यात कोठे वितरित करण्यात येणार होत्या. तसेच त्यांची छपाई कोठे करण्यात आली. याचा शाेध आता पाेलिसांना घ्यावा लागणार आहे़
पुण्यातून बुलढाणा जिल्ह्यात बनावट नोटा आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगाने धाड पोलिसांना सोबत घेतले. स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर मार्गावर मराठवाड्याच्या सीमेनजीक बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत म्हसला खुर्द शिवारात नाकाबंदी केली. गोपनीय माहितीच्या आधारावर एक सिल्व्हर रंगाची एमएच-१२-व्हीव्ही-०१३० क्रमांकाची गाडी पोलिसांनी थांबवली.
शासकीय पंच व अपर कोषागार अधिकारी यांच्यासमक्ष या गाडीची झडती घेतली. अशात गाडीमध्ये पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ५०० रुपयांच्या १६७० आणि २०० रुपयांच्या २५० बनावट नोटा मिळून आल्या. त्या ८ लाख ८३ हजार रुपयांच्या होत्या. अपर कोषागार अधिकारी व स्टेट बँक, धाड येथील अधिकाऱ्यांनी या नोटा तपासून त्या बनावट असल्याचे स्पष्ट केले.
प्रकरणी पोलिसांनी वाहनातील मंगेश दादासाहेब वाळे (५१, रा. सिंहगड रोड, पुणे) आणि मोहन वालीया मुडावत (४०, रा. पुणे) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून उपरोक्त बनावट नोटांसह चारचाकी वाहन, दोन मोबाइल असा १६ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक आशिष चेचरे, (धाड), यशोदा कणसे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेश टेकाळे, अनुप मेहर, पोलिस नायक विजय वारुळे, विजय पैठणे यांनी केली.








