Women in Ghussar village demand alcohol ban : घुस्सर गावात महिलांचा एल्गार; पोलिसांना दिले निवेदन
Buldhana घुस्सर बु. आणि घुस्सर खुर्द या गावातील महिलांनी गावातील अवैध देशी व गावठी दारूविक्रीविरोधात ठणठणीत आवाज उठवत बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन दिले. महिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. घरातील अन्नापासून महिलांच्या मजुरीपर्यंत सर्वच गोष्टी या व्यसनात झिरपल्या आहेत.
व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम
निवेदनात महिलांनी नमूद केले की, किशोरवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत दारूचे व्यसन वाढले आहे. दारू मिळवण्यासाठी घरातील वस्तू, अन्नधान्य विकले जाते. महिलांना मारहाण केली जाते. दारूच्या व्यसनातून अनेकांनी आत्महत्या केल्या. तर काही गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्थेवरही धोका निर्माण झाला आहे.
Buldhana Jigaon Project : बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पासाठी मंगळवारी मुंबईत बैठक !
विधवांचा वेदनादायक आवाज
दारूच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांतील अनेक महिलांचे पती मृत्युमुखी पडले असून त्या अल्पवयात विधवा झाल्या आहेत. अशा महिलांवर सहानुभूतीपेक्षा उपेक्षा आणि शोषणाचा धोका वाढला आहे. लहान मुलांची जबाबदारी आणि उपासमारीच्या छायेत त्यांचे जीवन हालाखीचे झाले आहे.
शांतता आणि सलोखा धोक्यात
गावात कोणतेही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम दारुड्यांच्या गोंधळामुळे धोक्यात येतात. सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा, धमक्या, गोंधळ हे रोजचेच झाले आहे. त्यामुळे गावातील शांतता व बंधुभाव भंग पावला आहे.
Water crisis in Buldhana : बुलढाण्यातील भीषण वास्तव; १९ गावे तहानलेली, ७ गावे टँकरवर!
अवैध दारू बंद करा – महिलांची ठाम मागणी
शोभा जाधव, सविता जाधव, उषा जाधव, अर्चना जाधव, आ.रा. वले, रमा इंगळे यांच्यासह असंख्य महिलांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की, दारूबंदीची कडक अंमलबजावणी करून कुटुंबांच्या उध्वस्त होणाऱ्या भवितव्याला वाचवावे.