Big blow to congress, many joins BJP : माजी नगरसेवक दीपक खरात यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
Buldhana चिखली नगर परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का देत माजी नगरसेवक दीपक खरात, राकेश सावजी, शेख इरफान यांच्यासह काँग्रेसमधील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार श्वेता महाले व जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश सोहळा भाजपसाठी एक मोठे राजकीय बळ समजले जात आहे.
स्थानिक संत सावता माळी भवन येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे होते. यावेळी डॉ. प्रतापसिंह राजपूत, ह.भ.प. प्रकाशबुवा जवंजाळ, पंडितराव देशमुख, सुरेशआप्पा खबुतरे, सुरेंद्र पांडे, मंगेश व्यवहारे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, संजय गाडेकर, सागर पुरोहित आदी अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. “काँग्रेस ही बुडालेली नौका आहे. या पक्षात नेतृत्व एकाच आडनावाभोवती केंद्रित राहिले आहे. गल्लीतून दिल्लीपर्यंत केवळ घराणेशाही जोपासण्यात आली. जाती-जातीमध्ये असुरक्षितता निर्माण करून मतांचं राजकारण करणं हीच त्यांची भूमिका राहिली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Babanrao Lonikar Statement : बबनराव लोणीकरांच्या बेताल वक्तव्यावर शिवसेना आक्रमक
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. या विकासाभिमुख नेतृत्वाला स्वीकारून अनेक काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत,” असेही महाले म्हणाल्या. या कार्यक्रमात माजी नगरसेवक दीपक खरात यांच्या पत्नी सौ. नेहा खरात यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिखली मतदारसंघात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे, असा राजकीय सूर व्यक्त होत आहे.