Cable car in Mumbai only after Gadkari’s permission : प्रकल्प राबविण्यासाठी भेट घेऊन चर्चा करणार
Mumbai मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची परवानगी आवश्यक आहे. दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन या प्रकल्पाविषयी चर्चा होईल. गडकरी यांनी विशेष परवानगी दिली तरच हा प्रकल्प मुंबईत होऊ शकणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवी दिल्ली येथे ७ जानेवारीला नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. ‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने ही बैठक होणार आहे. सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीला प्रताप सरनाईकदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान गडकरी यांची विशेष भेट ते घेतील. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवायचा आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला परियोजनेत ‘रोप वे’ विकसित करण्याचा मानस व्यक्त केला जाणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघरपासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेण पर्यंत क्षेत्र पसरले आहे. या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस ताण पडत आहे. त्यामुळे भविष्यात ‘केबल कार’ सारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे.
CM Devendra Fadnavis : सर्वाधिक हत्याकांडात गृहमंत्र्यांचे शहर राज्यात तिसरे !
नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला विशेष परवानगी देणे आवश्यक आहे. या भेटी दरम्यान गडकरी यांना या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दिले जाईल. मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले जाईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. मुंबई महानगर क्षेत्रातील नागरीकरण वाढत आहे. वाहनांची संख्याही वाढत आहे. त्या तुलनेत रस्ते व रेल्वे सेवा अपुरे पडत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असंही ते म्हणाले.








