Centenary of RSS : हिंदू असणं म्हणजे भारतासाठी जबाबदार असणं !

RSS is not attracted to power: RSS chief Mohan Bhagwat : संघाला सत्तेचा मोह नाही संघप्रमुख मोहन भागवत

Bangalore : “हिंदू असणं म्हणजे भारतासाठी जबाबदार असणं. हिंदू समाजाचं संघटन हे सत्तेसाठी नव्हे, तर राष्ट्रगौरवासाठी आहे,” असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

भागवत म्हणाले, “संघाला सत्तेचा कुठलाही मोह नाही. आमचं ध्येय सत्ताधिष्ठान नव्हे, तर सेवा आहे. जेव्हा संघ समाजासाठी एकसंधपणे उभा राहतो, तेव्हा उद्देश सत्तेचा नसतो, तर भारताच्या गौरवाचा असतो. हिंदू समाजाला संघटित करणं हे आमचं कर्तव्य आहे. एक काळ होता, जेव्हा लोकांना या विचारावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं; पण आज अनेकांच्या मनात संघाच्या उद्दिष्टांबद्दल विश्वास निर्माण झालेला दिसतो.”

Pune land scam : ‘गेम’ करायचा असेल तर होते सुपरफास्ट कारवाई

हिंदू ओळख आणि राष्ट्रीय जबाबदारी यावर भाष्य करताना भागवत म्हणाले, “हिंदू असणं म्हणजे भारतासाठी जबाबदार असणं. आपली राष्ट्रीयता ब्रिटिशांनी दिलेली नाही. आपण प्राचीन काळापासून हिंदू आहोत. जगातील प्रत्येक राष्ट्राची एक मूळ संस्कृती असते, आणि भारताची मूळ संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. त्यामुळे भारतातील कुणीही ‘अहिंदू’ नाही; सगळ्यांचे पूर्वज सारखेच आहेत.”

ते पुढे म्हणाले, “हिंदू समाजावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं की अनेकदा विचारलं जातं, ‘हे का करताय?’ पण प्रत्येक हिंदू ही भारतासाठी उत्तरदायी व्यक्ती आहे. ही जबाबदारी जाणून घेणं आणि त्यासाठी कार्यरत राहणं, हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आत्मा आहे.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासाबाबत ते म्हणाले, “संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात ६० ते ७० वर्षे ही तीव्र संघर्षाची होती. दोन वेळा संघावर बंदी घालण्यात आली, स्वयंसेवकांवर हल्ले झाले, टीका झाली, हत्या झाल्या. आपला विस्तार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र स्वयंसेवकांनी निस्पृह भावनेने आपलं कार्य थांबवलं नाही. त्याच निष्ठेमुळे आज संघ लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकला.”

Mahayuti in Nagpur : उपराजधानीत शिंदेसेना–राष्ट्रवादीची स्वतंत्र तयारी !

भागवत यांनी या व्याख्यानात पुन्हा एकदा संघाची भूमिका स्पष्ट केली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ धार्मिक किंवा राजकीय संघटना नसून एक सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्राभिमानाने प्रेरित चळवळ आहे. “आमचा उद्देश सत्ता नव्हे, तर समाज. भारताचा आत्मा जागृत ठेवणं हेच आमचं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे,” असं सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.