25 crore workers of left organizations will protest on the streets : केंद्र सरकारच्या विरोधात मेमध्ये करणार एल्गार
Nagpur केंद्र शासनाच्या खासगीकरणाच्या भूमिकेविरोधात डाव्या संघटनांकडून मार्च महिन्यात आंदोलन करण्यात येणार आहे. १८ मार्चला दिल्लीत कामगारांचे देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मे महिन्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मे महिन्यात देशातील २५ कोटी कामगार रस्त्यावर उतरून कामगार विरोधी धोरणांचा विरोध करतील. अशी माहिती सीटुचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदे रद्द करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात २ लाख, तर देशात २५ लाख पदे रिक्त आहेत. परंतु ही पदे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत. यात कामगारांचे अतोनात शोषण करण्यात येत आहे. कामाच्या मोबदल्यात कामगारांना अत्यल्प मानधन मिळत आहे. बांधकाम कामगार, घर कामगारांना वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांसाठी रविवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यात निवृत्तीनंतर आशा व गटप्रवर्तकांना ५ लाख ग्रॅच्युईटी, १० हजार पेन्शन द्यावी, त्यांचे शासकीय सेवेत समायोजन करावे आदी मागण्या करण्यात कराड यांच्याकडून करण्यात आल्या.
यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले आहे. जर खरोखर असे आंदोलन झाले तर विविध क्षेत्रांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः मोठ्या बाजारपेठा असलेली शहरे व वाहतूक क्षेत्राचे काम यामुळे ठप्प पडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.