sudhir-mungantiwar-chandrapur-corporation-victory-strategy-analysis-2026 : बंडाळी आणि बाह्य आव्हाने असूनही भाजपचाच भगवा फडकला
Chandrapur राजकारणाच्या आखाड्यात अनेकदा चितपट होणारी परिस्थिती समोर असताना, एखादा अनुभवी खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या हातालाही लागू न देता बाजी कशी पलटवतो, याचा प्रत्यय चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेत आला. ‘तेल लावलेल्या पहेलवाना’प्रमाणे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या राजकीय आखाड्यात आपल्या अनुभवाचा आणि चातुर्याचा वापर केला. आणि अंतर्गत बंडाळी आणि बाह्य आव्हाने असूनही महापालिकेवर अखेर भाजपचाच भगवा फडकला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोपवलेली जबाबदारी मुनगंटीवारांनी अत्यंत संयमाने आणि अचूक रणनीतीने पार पाडली. त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात त्यांनी मारलेली बाजी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाला चांगलेच अस्वस्थ करून सोडले आहे.
चंद्रपूर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून झालेला संघर्ष हा या निवडणुकीतील सर्वात मोठा अडथळा होता. प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी आणि स्थानिक पातळीवर झालेले बदल यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली होती. उमेदवार चोरी आणि बी-फॉर्मसंदर्भातील घोषणाबाजीमुळे पक्षशिस्तीला तडे गेले होते
Ravindra Chavhan : भाजपची मोठी कारवाई; 69 बंडखोर कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित
उमेदवारी अर्जावरून महानगराध्यक्षांवर झालेली कारवाई आणि कार्यकर्त्यांमधील दोन गट, यामुळे भाजपला विजय मिळवणे कठीण जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण मुनगंटीवार गनिमी काव्याच्या तयारीत आहेत, याचा कुणाला थांगपताच लागला नाही. अखेरच्या क्षणाला मुनगंटीवार आखाड्यात उतरले आणि सारा डावच पलटवून टाकला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुधीर मुनगंटीवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पक्षांतर्गत असलेल्या असंतोषाला शांत करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावर संवाद साधला. पक्षापेक्षा मोठी कोणतीही व्यक्ती नाही, याची जाणीन त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.
पण त्याचवेळी केवळ भाजपच्या जागांवर अवलंबून न राहता, त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत विसंवाद आणि विखुरलेल्या अपक्षांची ताकद योग्य वेळी आपल्या बाजूने वळवली. महापौरपदाच्या अर्जावरून गोंधळ उडाला, तेव्हा मुनगंटीवारांनी दिल्ली आणि मुंबईतील नेत्यांशी समन्वय साधून पक्षाचा अधिकृत उमेदवारच खुर्चीवर बसेल, याची व्यवस्था केली. हे एवढे सोपे नव्हते. पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीच शक्य करून दाखविण्यासाठीच मुनगंटीवारांची राजकारणात ओळख आहे. ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
Sharad pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती!
चंद्रपूरमधील हा विजय केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर तो नियोजनाचा विजय ठरला. मुनगंटीवारांनी दाखवून दिले की, जेव्हा पक्षशिस्त ढासळते, तेव्हा केवळ अनुभवी नेतृत्वच परिस्थिती सावरू शकते. प्रतिकूल परिस्थितीतही संयम न गमवता विरोधकांच्या चाली ओळखून त्यांनी सत्तेचे गणित जुळवले. भविष्यात अशा प्रकारचे अंतर्गत कलह टाळण्यासाठी संघटनात्मक फेरबदलांची गरज आहेच. पण सध्या सुधीर मुनगंटीवारांच्या रणनीतीमुळे चंद्रपूरमध्ये भाजपची पकड पुन्हा घट्ट झाली आहे, हेच वास्तव आहे.








