Bawankule angry at officers who left headquarters without permission : निलंबनाचा दिला इशारा; लोकांची कामं करा, ताटकळत ठेवू नका
Nagpur : महसूल विभागात काही अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने गैरहजर राहात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. परीणामी कार्यालयांमध्ये लोकांना ताटकळत राहावे लागते. आपण जनतेची कामे करण्यासाठी आहोत, त्यांना ताटकळत ठेवण्यासाठी नाही, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.
महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी आहे. आपल्या सेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे सोडले जाणार नाही. महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास एक संधी दिली जाईल. त्यानंतर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील तहसीलदार ते निवडश्रेणीतील अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक (भूमी अभिलेख) यांच्या अधिनस्थ असलेले काही अधिकारी गैरहजर राहात असल्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सूचना दिल्या आहेत.
Devendra Fadanvis : आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था, सायंकाळपर्यंत १८३ पर्यटक मुंबईत येणार !
सामान्य प्रशासन विभागाच्या हवाल्याने तसे परिपत्रकही काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. विभागाच्या महत्वाच्या बैठका आणि आकस्मिक परिस्थितीमध्ये प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. अशात अधिकारी आणि कर्मचारी नसले की लोकांनाही त्याचा फटका बसतो. त्यामुळे पूर्वपरवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडत असल्यास आधी त्यांना इशारा द्या. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास तात्काळ शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करा गरज पडल्या निलंबनाची कारवाई करा, असेही परिपत्रकात म्हटले आहे.