Congress slams BJP’s poll manifesto : निवडणूक संकल्पपत्रावर काँग्रेसची जोरदार टीका; नागपूरला कोट्यवधींचा निधी, अमरावतीला मात्र ठेंगा
Amravati अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेले संकल्पपत्र म्हणजे भाजपची ‘गॅरंटी’ नसून अमरावतीकरांची सरळसरळ फसवणूक आहे, अशी सडकून टीका काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.
भाजपच्या संकल्पपत्रात ‘सुरक्षित अमरावती’ आणि ‘विकसित अमरावती’ची हमी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र २०१७ पासून अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता होती. इतकेच नव्हे, तर प्रशासक राजवटीतही राज्यात भाजपचेच सरकार आहे. असे असताना अमरावतीचा अपेक्षित विकास का झाला नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की विदर्भाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये भाजपने कोट्यवधी रुपयांची रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे केली. मात्र अमरावती शहराला जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवण्यात आले. आजही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत नाही. गेल्या आठ वर्षांपासून चित्रा चौकातील उड्डाणपूल पूर्ण होऊ शकलेला नाही.
अमरावती रेल्वे स्थानकाच्या स्थलांतराचा डाव आखून सुमारे २,७०० कोटी रुपयांची जागा गिळंकृत करण्याचे भाजप नेत्यांचे मनसुबे असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. एकूणच भाजप नेते अमरावती शहराशी ‘सापत्न’ वागणूक देत असून, गेल्या आठ वर्षांत शहराला उद्ध्वस्त करण्याचे काम केले, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
भाजपच्या संकल्पपत्रात विकासकामांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र २०१७ च्या महापालिका निवडणुकांनंतर अमरावती महापालिकेची सत्ता भाजपकडेच होती. तरीही शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही, असा आरोप माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी केला.
रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत, उड्डाणपूल पूर्ण झाला नाही, सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली नाही, तसेच शाळांची दुरवस्था कायम आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असताना, तसेच महापालिकेतही भाजपच सत्ताधारी असताना अमरावतीच्या विकासाला नेमके कुणी अडवले, असा थेट सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.








