Nagpur district’s sports policy will gain momentum : मंत्रालयात पार पडली नागपूरच्या क्रीडा धोरणाला गती देणारी बैठक
Mumbai : नागपूर जिल्हा क्रीडा संकुल गादा – कामठी येथे १९ एक जागेवर तयार केले जात आहे. सोबत नरखेड तालुका क्रीडा संकुलाचेही काम वेगाने सुरू आहे. या कामांसाठी क्रीडा विभागाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR मधून निधी मिळवून देण्यासाठी अध्यादेश काढण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
महसूल मंत्र्यांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचित अनिल डिग्गीकर आणि क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सुरुवातीला २८ मार्च २०१६ रोजी २६.३८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, जी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ८५.४३ कोटी रुपयांपर्यंत सुधारित करण्यात आली. आतापर्यंत या संकुलाला २२.३९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. संकुलासाठी १५ कोटी रुपयांची अनुदान मर्यादा असताना, १०.१० कोटी रुपये खर्च झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २.८० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत, तर ९.४७ कोटी रुपये संकुल समितीच्या बँक खात्यात शिल्लक आहेत. तर ६०.४८ लाख रुपये अजूनही देय आहेत.
Bachchu Kadu : राज्यात आणि केंद्रात मित्र पक्षांवर दबाव आणण्याचे भाजपचे तंत्र !
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ६०.४८ लाख रुपये निधी वितरीत करण्याची आणि शासन अनुदान मर्यादेव्यतिरिक्त ६२.४३ कोटी रुपये जादा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र राज्य क्रीडा विकास समितीच्या निर्णयानुसार, अतिरिक्त सुविधा संकुल समितीने स्वबळावर निधी उभारण्याच्या अटीवर सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ८५.४३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यांना मंत्रिमंडळाची सुधारीत प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.








