Breaking

Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांची ‘मंडल यात्रा’ म्हणजे नौटंकी, बावनकुळेंची टीका

Sharad Pawar’s ‘Mandal Yatra’ is just a gimmick : ५० वर्षे सत्तेत असताना ओबीसींसाठी काहीच केले नाही, फक्त मतभेद निर्माण केल्याचा दावा

Amravati “शरद पवार हे ४० ते ५० वर्षे सत्तेत होते. त्या काळात ओबीसी समाजासाठी काय केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आधी मराठा समाजात वाद निर्माण केला, आता ओबीसींमध्ये मतभेद पसरवण्याचे काम ते करत आहेत. मात्र, ओबीसी समाज त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही,” अशी सडकून टीका राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे केली.

बावनकुळे हे अमरावतीतील एका कार्यक्रमानिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ९ ऑगस्ट रोजी नागपुरातून ‘मंडल यात्रे’ला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. “सत्तेत असताना ओबीसी समाजाचा विचार न करणे आणि सत्ता गेल्यानंतर ओबीसींचा पुळका आणणे, ही त्यांची जुनी राजकीय शैली आहे. केंद्र व राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असतानाही त्यांनी ओबीसींना कधीच न्याय दिला नाही, जातनिहाय जनगणना केली नाही,” असा आरोप त्यांनी केला.

Chandrashekhar Bawankule: वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये!

बावनकुळे म्हणाले, “ओबीसींना खऱ्या अर्थाने न्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आरक्षणाच्या लढाईला न्याय मिळवून दिला. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये १३ हजार पदांवर ओबीसींना हक्काचा वाटा मिळणार आहे. राज्यातील ओबीसी महामंडळांना संवैधानिक दर्जा दिला, तसेच १८ महामंडळे विविध समाजांना देण्यात आली. अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांमुळे ओबीसी समाज शरद पवार यांच्या मंडल यात्रेच्या नौटंकीला बळी पडणार नाही,” असा दावा त्यांनी केला.

Prahar Janshakti Party : प्रहारच्या महिलांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना बांधल्या काळ्या राख्या!

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आताच तपासून घ्यावी. आक्षेप नोंदवायचे असतील तर आताच नोंदवा, नाहीतर निवडणुकीत पराभव झाल्यावर मतदार यादी चुकीची होती, असे सांगू नका. आम्ही ५१ टक्के मतांनी या निवडणुका जिंकणार आहोत. राहुल गांधींच्या गूडबुकमध्ये राहण्यासाठी यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार बोलत असतील, परंतु राहुल गांधींना देशाची आणि विकासाची नाळ समजलेली नाही. या पवित्र निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेणे योग्य नाही,” अशी टीका त्यांनी केली.