Chandrashekhar Bawankule : नागपूरचा महापौर भाजप ठरवेल, वडेट्टीवार नव्हे!

Vijay Wadettiwar criticised for pulling a publicity stunt : काँग्रेस नेत्याचा पब्लिसिटी स्टंट, बावनकुळेंचे प्रत्युत्तर


Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडी घेतली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षण सोडतीवर केलेल्या ‘मॅच फिक्सिंग’च्या आरोपांचा समाचार घेताना, “वडेट्टीवार फक्त चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करतात,” असा टोला बावनकुळेंनी लगावला. नागपूरचा महापौर कोण असेल, याचा निर्णय केवळ भाजपच घेईल आणि तो आमचा अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या आरक्षण सोडतीवर संशय व्यक्त करत, शिवानी दाणी यांना महापौर करण्यासाठीच महिला आरक्षण काढल्याचा दावा केला होता. याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, आरक्षणाची संपूर्ण सोडत प्रक्रिया ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप शक्य नाही. वडेट्टीवार हे हुशार नेते आहेत, पण केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि बातमी व्हावी या हेतूने ते असे आरोप करत आहेत. हे त्यांच्या पदाला साजेसे नाही.

Vikas Thakre : बंडखोरांच्या पराभवानंतर विकास ठाकरेंनी जुना हिशोब केला पूर्ण

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, नागपूरमध्ये भाजपला १०२ जागांसह निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे इथल्या महापौराचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भाजपलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे सर्व प्रमुख नेते मिळून महापौराचे नाव निश्चित करतील. यात काँग्रेसने किंवा विरोधकांनी लुडबूड करण्याचे काहीही कारण नाही. नागपूरसह अकोला आणि चंद्रपुरातही महिलांना महापौर होण्याची संधी मिळाली आहे. हे खरे तर स्वागतार्ह आहे, पण वडेट्टीवार जाणीवपूर्वक केवळ मुख्यमंत्र्यांच्या शहरावर टीका करत आहेत.

“विदर्भात भाजपला मिळालेला कौल हा विकासाचा आहे. विरोधकांनी अशा फालतू आरोपांत वेळ घालवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.