Chhagan Bhujbal : सभेआधीच छगन भुजबळांची तोफ धडाडली

Direct attack on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्लाबोल

Beed : बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा होत असून चार वाजता हा मेळावा पार पडणार आहे. या सभेपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळांनी जरांगे आणि मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप करत ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली. या सभेत 2 सप्टेंबर 2025 रोजीचा मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. त्यामुळे सभेनंतर वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, “या लोकांना माझा इतिहास माहिती नाही. शिवसेनेत असताना केलेल्या संघर्षांची कल्पना नाही. शिवसेना सोडल्यानंतर अनेक आव्हानं पचवली आहेत. हे सगळे लहान होते तेव्हा मी आंदोलनात होतो,” असा टोला त्यांनी मनोज जरांगे पाटलांना लगावला.

Local Body Elections : महाविकास आघाडीची रणनिती ठरली; स्थानिक निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय

भुजबळांनी पुढे म्हटलं, “ज्या बीडमध्ये जरांगे यांच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं जाळली, ओबीसी नेत्यांवर हल्ले केले, त्याच ठिकाणी आज ओबीसी महाएल्गार सभा होत आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांसारखे नेते उपस्थित राहणार आहेत.” त्यांनी आत्महत्येच्या घटनांचा उल्लेख करत समाजाला आवाहन केलं की, “आरक्षण धोक्यात नाही, अशा भीतीतून आत्मघात करू नका. ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.”

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या मेळाव्याला अजित पवार गट पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. त्यावर भुजबळांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं, “हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही. हा सर्वपक्षीय ओबीसींचा मेळावा आहे. ओबीसी समाज एकत्र येण्यासाठी हा उपक्रम आहे.”

या सभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी “आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत,” असं सांगत या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Local Body Elections : दहा गटांतील मतदार ठरवणार जिल्हा परिषद महिला अध्यक्ष

ओबीसी महाएल्गार सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठी तयारी करण्यात आली असून, सभेच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. या सभेनंतर राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.