From Where did this cruelty come in Maharashtra : महाराष्ट्रात सुरू असलेला औरंगजेबपणा संपवला पाहिजे
Mumbai : गेल्या काही काळात महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्या, ज्या आजवर कधीच घडल्या नव्हत्या. बीड, परभणी, जालना एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे, असे सांगताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काळजी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोठून आले येवढे क्रौर्य, असा प्रश्न करीत हे क्रौर्य आपण संपवू शकणार आहोत की नाही, असाही सवाल त्यांनी केला.
सभागृहात आज (५ मार्च) भुजबळ म्हणाले, अवघे विश्वची माझे घर, असे सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत संतांनी काय शिकवण दिली? आपण ती किती अंगिकारली, हे कळायला मार्ग नाही. बीडच्या प्रकरणाचे चित्र पहावत नाही. त्या घटनेचा सर्वांनी निषेध केला. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या कस्टडीत मरण पावला. त्याची चौकशी होणार आहे की नाही. दलितांवर अन्याय झाला तर कारवाई करणार आहात की नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
लातूरला धनगर समाजाच्या एका मुलाचे काही प्रकरण झाले. तर त्याची नखे काढून अमानूष छळ करण्यात आला. परवाच्या दिवशी जालन्यात कैलास बोराडे हा धनगर समाजाचा माणूस शिवमंदिरात गेला. तर कोळशे पेटवून त्याला सळाखीने चटके देण्यात आले. कोण करणार याचा निषेध. कोण आहेत हे लोक? कोठून आले येवढे क्रौर्य? यामागे कुठल्या शक्ती आहेत, याचा विचार होणार आहे की नाही, असेही प्रश्न भुजबळ यांनी सभागृहात उपस्थित केले.
औरंगजेबपणा संपवला पाहिजे..
हा काही राजकारणाचा विषय नाही. तर सर्वांनी मिळून हे क्रौर्य थांबवले पाहिजे. राजकीय नेते, लेखक, पत्रकार यांनी एकत्र येऊन हे सर्व थांबवले पाहिजे. महाराष्ट्रात सुरू असलेला हा औरंगजेबपणा संपवला पाहिजे. केवळ कायद्यावर ढकलून चालणार नाही. कारण यामध्ये पोलिसांनाही दोष देता येणार नाही. गरज आहे ती सर्वांनी एकत्र मिळून हे क्रौर्य संपवण्याची, असेही छगन भुजबळ यांनी सभागृहाला सांगितले.
Shivsena Uddhav Thackeray : पक्षाचा रंग उतरतोय, पण होळीचा चढणार!
त्यांच्यावर ३०७ नाही तर मोक्का लावा..
जालन्यात कैलास बोराडेसोबत जे काही घडले, त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, बोराडेला सळईने चटके दिले गेले. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यांच्यावर कलम ३०७ अन्वये नाही तर मोक्का लागला पाहिजे. एकही गुन्हेगार सुटता कामा नये. यावर वरच्या सभागृहातही उत्तर दिले आहे. या सर्व घटनांच्या मुळापर्यंत आपण जातो आहे. यापुढे असे धाडस कुणी करू नये, अशी कारवाई करणार आहोत.