Raj-Uddhav alliance won’t work outside Mumbai : राजकीय जुळवाजुळव, मराठा आंदोलन व बंगला वादावर स्पष्ट सांगितले.
Nashik : नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर थेट भाष्य करत, “मुंबई महापालिकेपुरती युती शक्य, पण इतर ठिकाणी ती अंमलात येण्याची शक्यता कमी आहे,” असे भाकीत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जवळिकीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
“प्रत्येक पक्षाची ताकद वेगळी आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवारीची अपेक्षा असते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात,” असे सांगत भुजबळांनी महायुतीतील एकत्र आणि स्वतंत्र लढण्याच्या पर्यायावरही स्पष्ट संकेत दिले. त्यांनी फडणवीसांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत, “महायुतीत काही ठिकाणी एकत्र, काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे,” हे पुन्हा अधोरेखित केले.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, भुजबळांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “लोकशाहीने आंदोलनाचा अधिकार दिला आहे, परंतु सध्या जरांगे नक्की कशासाठी आंदोलन करत आहेत, हे स्पष्ट नाही. कारण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं असून, त्यासाठी सरकार न्यायालयात भक्कम भूमिका मांडत आहे,” असे ते म्हणाले.
या संवादात त्यांनी राज्यातील सामाजिक प्रश्नांव्यतिरिक्त काही व्यवस्थापकीय मुद्द्यांवरही मत व्यक्त केलं. डान्स बारबाबत भाष्य करताना भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे की डान्स बार आपल्याकडे नकोत. त्यामुळे असे प्रकार सुरू असतील, तर ते थांबले पाहिजेत.”
याशिवाय आपल्या निवासस्थानासंदर्भात निर्माण झालेल्या वादावर त्यांनी संयमित भूमिका मांडली. “मंत्री झाल्यानंतर मला सातपुडा निवासस्थान देण्यात आलं, पण सध्या त्या बंगल्यात आमचेच सहकारी राहतात. मी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंडळी या विषयावर निर्णय घेतील. बंगला रिकामा झाला की मी तिथे राहायला जाईन,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यांनी हेही नमूद केलं की दुसरं एखादं छोटं घर मिळालं तरी त्यांना हरकत नाही.
Buldhana BJP : भाजपने रणशिंग फुंकले, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
संपूर्ण संवादात भुजबळांनी एकीकडे युतीबाबत शक्यता आणि अडचणींवर प्रकाश टाकला, तर दुसरीकडे राज्यातील सामाजिक-प्रशासकीय घडामोडींवर मत व्यक्त करत आपली भुमिका स्पष्टपणे मांडली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीसह महायुतीचे आगामी राजकीय समीकरण कोणत्या वळणावर जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.