Chichghat became the first solar model village in Vidarbha : सौरऊर्जेच्या प्रकाशात झळकणार अख्खे गाव
Hinganghat सूर्यप्रकाशाची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. पण आपल्याकडे सौरऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो. मात्र, हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) या गावात विजेपासून जेवणापर्यंत सर्व कामे आता सौरऊर्जेचा वापर करूनच होत आहे. त्यामुळे चिचघाट हे गाव विदर्भातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारे गाव ठरले आहे. संपूर्ण गाव सौरऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ या अंतर्गत विद्युत विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या तीन महिन्यांतच हा प्राेजेक्ट पूर्ण करून चिचघाट गाव विदर्भातील पहिले सौरग्राम ठरले आहे.
Gandhi Smarak Samiti : गांधी-विनोबांमुळे सेवाग्राम हे तीर्थस्थान
हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव अवघ्या १८७ लोकसंख्या असलेले तसेच ७० घरे असलेले गाव आहे. हे गाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ वसले आहे. विविध अडचणींचा सामना करत विद्युत विभागाने यासाठी बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त वतीने कार्यशाळा घेत गावकऱ्यांचे प्रबोधन करत या प्रकल्पाच्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली होती.
चिचघाट (राठी) गावात आवश्यकतेनुसार ७० रहिवासी असलेल्या घरांना सौरऊर्जा पॅनलची जोडणी करण्यात आली आहे. यामध्येसुद्धा अपवादात्मक परिस्थितीवर मात करत २८ टिनांच्या आणि काैलारू घरे असलेल्या रहिवासी नागरिकांनादेखील या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाला शंभर टक्के शासकीय बँकेचे अर्थसाहाय्य देखील लाभले. मात्र, बँक फायनान्स दरम्यान अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प मार्गी लागणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण होऊ लागली होती. मात्र, विद्युत विभागातील अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पावडे यांनी येणाऱ्या सर्व अडचणींवर मात केली.
प्रकल्पाला गती देण्याचे काम करत विविध त्रुटी दूर सारत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल, याबाबत शर्थीचे प्रयत्न करून प्रकल्पाला चालना दिली. परिणामी, चिचघाट हे गाव शंभर टक्के सौरग्राम ठरले आहे. विशेष म्हणजे यासाठी बँक ऑफ बडोदा ही महत्त्वाचा दुवा ठरली. शासनाच्या जन समर्थ या पोर्टलद्वारे सौर प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य बँकेने मिळवून दिले.