Opposition protest before CJI felicitation : विरोधी पक्षाचे आंदोलन, पत्राच्या माध्यमातून तक्रारीचा पाढा
Mumbai : अमरावतीचे सुपुत्र, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सत्कार कार्यक्रमापूर्वी विरोधकांनी पायऱ्यावर आंदोलन केले. सरकार आणि काही मंत्र्यांवर शेरेबाजी केली. तसेच पत्र देत अन्याय होत असल्याबद्दल, तसेच लोकशाहीची गळचेपी केली जात असल्याबद्दल तक्रारीचे पत्र त्यांना देण्यात आले.
सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर भूषण गवई जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आले, त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं कोणताही प्रोटोकॉल न पाळल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता अधिवेशनात सरन्यायाधीशांचा सत्कार केल्यानंतर विरोधी नेत्यांनी अन्यायाचा पाढाच वाचला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होऊन नऊ महिने झाले, तरी अद्याप महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. महाविकास आघाडीतर्फे आमदार भास्कर जाधव यांचं नाव सूचवण्यात आलं आहे. मात्र,या नावाबाबत अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
opposition leader : विरोधक आक्रमक पण…विरोधी पक्ष नेते पदाचा तिढा कायमच
विरोधी पक्षानं याबाबत सरकारकडं दाद मागितली. मात्र, याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असं म्हणून सरकारनं टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. सोबतच दोन नावानं सध्या महाराष्ट्रात चार पक्ष आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेचे दोन गट असे चार पक्ष महाराष्ट्रात आहेत. त्याबाबत ही अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत विरोधी पक्ष नेत्यांनी सरन्यायाधीशांकडं दाद मागितली आणि त्यांना न्याय देण्याबाबत पत्र देखील दिल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ आज महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केलेला आहे. आम्ही विरोधी पक्षांकडून विरोधकांचा आवाज कसा दाबला जात आहे, याची माहिती सरन्यायाधीशांना पत्राद्वारे दिली आहे. शिवाय विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, हे निदर्शनास आणून दिलं. सत्ताधाऱ्यांना आमची भीती का वाटते? या बाबी आम्ही त्यांना पत्रातून अवगत केल्या आहेत. 4 पक्ष दोन पक्षाच्या नावानं सुरु आहेत. हे सगळं निस्तरण्याची गरज आहे. गडबड घोटाळा केल्यानं सरकार आम्हला घाबरतेय,’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.