Amravati Sub-Divisional Office website launched : उपविभागीय कार्यालयाचे संकेतस्थळ सुरू; राज्यभर अंमलबजावणी
Amravati मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत सुलभ, लोकाभिमुख व गतिमान प्रशासनाचा एक भाग म्हणून उपविभागीय अधिकारी, अमरावती यांनी त्यांच्या कार्यालयाचे www.sdoamravati.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी संकेतस्थळाची गरज आणि त्यातील वैशिष्ट्ये याविषयी सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “राज्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे हे दुसरे संकेतस्थळ असून, या संकल्पनेची राज्यभर अंमलबजावणी करण्याचा विचार आहे.”
अमरावती उपविभागाचा इतिहास: नागरिकांसाठी उपविभागाचा विस्तृत इतिहास उपलब्ध.
गावांचे नकाशे: विभागातील सर्व गावांचे नकाशे उपलब्ध, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या नकाशासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.
प्रशासकीय माहिती: अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्यामुळे नागरिकांना योग्य अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधणे सोपे होईल.
शासकीय योजना व सेवा: रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा यांसारख्या योजनांची सविस्तर माहिती, अर्जाचे नमुने व शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध.
मीडिया गॅलरी: कार्यालयाच्या विविध उपक्रमांचे छायाचित्र संग्रहित.
संपर्क सुविधा: हेल्पलाइन क्रमांक व ई-मेलद्वारे थेट संपर्काची सोय.
QR कोड सुविधा: नागरिकांसाठी संकेतस्थळावर प्रवेश सुलभ करण्यासाठी QR कोड तयार करण्यात आला आहे, जो सर्वत्र प्रसिद्ध केला गेला आहे.