After suffering the pain of partition, Hashu Advani did social work : जन्मशताब्दी सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Mumbai साधी राहणी उच्च विचारसरणीचा अंगीकार करीत हशुजी अडवाणी यांनी आपलं आयुष्य समाजसेवेला समर्पित केलं. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. देशाची फाळणी झाल्यानंतर फाळणीच्या वेदना सोसत निर्वासित म्हणून ते नव्या भारतात आले. पण त्यानंतर त्यांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली अर्पण केली.
स्व. हशू अडवाणी जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, टिप्स कंपनीचे संचालक कुमार तौराणी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश मलकाणी, सचिव राजेश ग्यानी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘देशाच्या फाळणीनंतर सिंधी समाज हा निर्वासित म्हणून भारतात आला. शिबिरांमधून सिंधी समाजाचे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनाच्या कामात स्व. हशुजी यांनी मोठी भूमिका बजावली. स्वतः घरदार पाकिस्तानात सोडून ते आले. पण निर्वासितांचे अश्रू पुसण्याचे काम केले. सिंधी समाजाने संघर्षातून विश्व निर्माण केले आणि आज प्रत्येक क्षेत्रात समाज प्रगती करीत आहे.’
हशुजींनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती केली. नगरसेवक ते मंत्री पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी राज्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांनी स्थापन केलेली शैक्षणिक संस्था स्वामी विवेकानंद यांच्या नावाने आहे. यावरूनच त्यांचा द्रष्टेपणा लक्षात येतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Mahayuti Government : सरकारचा मोठा निर्णय! हा विभाग कायमचा बंद होणार
हशू आडवाणी यांच्या जीवन कार्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे विमोचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.