CM Devendra Fadnavis : खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालणार

Assurance to personally intervene in the Khamgaon–Jalna railway line issue : मुख्यमंत्र्यांचा लोकआंदोलन समितीला शब्द

Chikhli खामगाव ते जालना या अत्यंत महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रेल्वे लोकआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीचे आयोजन आमदार श्वेताताई महाले यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

या वेळी समितीच्या वतीने खामगाव–जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्री पातळीवर थेट हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय विशेष बाब म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडून तातडीने पाठपुरावा करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. या भेटीप्रसंगी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते.

Illegal gravel excavation : तहसीलदाराच्या पथकावर हल्ला; मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की,

रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य डॉ. किशोर वळसे आणि रेणुकादास मुळे यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार गोपाल तुपकर, माजी नगरसेवक शेख अनीस, गोविंद देव्हडे, दीपक खरात आणि संजय जैन उपस्थित होते.

निवेदनात खामगाव–जालना रेल्वेमार्गाचे आर्थिक, औद्योगिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले व्यापक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी या प्रकल्पासाठी ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल समितीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

हा रेल्वेमार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून, शेगाव व शिर्डी ही प्रमुख तीर्थक्षेत्रे थेट मुंबईशी जोडली जातील. वर्धा व जालना ड्रायपोर्टचा जेएनपीटीशी थेट संपर्क निर्माण होऊन उद्योगांना मोठी चालना मिळेल. लोणार सरोवर, अजिंठा लेणी, जिजाऊ जन्मस्थान, सैलानी दर्गा यांसारख्या पर्यटनस्थळांना नवसंजीवनी मिळेल.

तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा व बिडकीन औद्योगिक क्षेत्रांना दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमार्गे देशाच्या पूर्व भागाशी मजबूत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जालना स्टील सिटी व सीड हबमधील उत्पादन देशभर जलद पोहोचेल. कोलकाता–मुंबई या व्यस्त मार्गाला पर्याय म्हणून कोलकाता–शेगाव–जालना–छत्रपती संभाजीनगर–मानमाड–मुंबई असा स्वतंत्र फ्रेट कॉरिडॉर विकसित होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली.

Sudhir Mungantiwar : ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करून एसीबीमार्फत चौकशी करा

राज्याचा आर्थिक हिस्सा जाहीर होऊन जवळपास २० महिने उलटूनही केंद्राची मंजुरी मिळालेली नसल्याने, हा प्रकल्प तातडीने मंजूर करावा, अशी ठाम अपेक्षा रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.