Police forces will be empowered with advanced equipment : पोलिसांसाठी ‘डीजी लोन स्कीम’द्वारे स्वमालकीच्या घरासाठी मदत
Amravati पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. येत्या काळात पोलिसांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
कोंडेश्वर येथे अमरावती ग्रामीण पोलिस दलासाठी नव्याने उभारलेल्या निवासस्थान इमारती, प्रशासकीय इमारत, चारचाकी वाहने, शहर पोलिस दलासाठी नवीन वातानुकूलित वाहतूक कक्ष, तसेच महिला विसावा कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांच्या साहाय्याने नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल तसेच पोलिसिंग अधिक गतिमान व परिणामकारक बनेल. यामुळे पोलिसांचे कार्यसुधारणा आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल.”
पोलीस दलात समाविष्ट केलेली अद्ययावत वाहने सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत. तसेच पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून दर्जेदार निवास सुविधा उभारल्या जात आहेत. पोलिसांसाठी ‘डीजी लोन स्कीम’द्वारे स्वमालकीच्या घरासाठी मदत पुरवली जात आहे.
Pravin Datke : काँग्रेसची सद्भावना यात्रा म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा केवीलवाणा प्रयत्न !
शहर पोलिसांसाठी नव्याने तयार केलेले वातानुकूलित वाहतूक कक्ष आणि महिला विश्रांती कक्ष हे पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या कार्यक्रमात शहानूर शासकीय निवासस्थान इमारतीच्या कोनशिलेस अनावरण करण्यात आले, तर १८ नवीन चारचाकी वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी कोंडेश्वर येथील नव्याने बांधलेल्या निवासस्थानांच्या चाव्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आल्या.








