Tribal couple’s appeal, save my son : आदिवासी दाम्पत्याची व्यथा; मुलाची नागपूरमध्ये मृत्यूशी झुंज
Gadchiroli भामरागड तालुक्यातील एका आदिवासी युवकाला ताप आल्याचे निमित्त झाले अन् प्रकृती खालावली. नागपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात भरती केले. पत्नीचे मंगळसूत्र मोडले. व्याजाने घेऊन पैसे भरले. पण आणखी एक लाख भरा म्हणून सांगितले जाते. तीन दिवसांपासून पती-पत्नी उपाशी आहेत. हतबल झालेल्या पित्याने मुलाला वाचविण्यासाठी ३१ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ‘तुम्हीच आमचे पालक, माझ्या मुलाला वाचवा…’ अशी साद या दाम्पत्याने घातली आहे.
सुनील रमेश पुंगाटी (१७,रा. हितापाडी ता. भामरागड) असे त्या युवकाचे नाव. २५ जानेवारीला सुनील यास ताप आला,त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. ताप डोक्यात गेल्याने आजारी पडलेल्या सुनीलला घेऊन पिता रमेश रामा पुंगाटी नागपूरला गेले. मुलाला एका खासगी दवाखान्यात भरती केले. आतापर्यंत एक लाख रुपये उपचार खर्च आला. मुलाला वाचविण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र मोडले व व्याजानेही पैसे घेतले, पण आणखी एक लाख रुपये जमा करा म्हणून दवाखाना प्रशासनाने सांगितले.
Mahatma Gandhi : १ फेब्रुवारीला सेवाग्राम आश्रमात येणार होते बापू!
पैसे नसल्याने तीन दिवसांपासून हे दाम्पत्य उपाशी आहे. अशा परिस्थितीत पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. निराश झालेल्या रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पालकमंत्री या नात्याने मुलाला वाचवा, अशी विनंती केली आहे.
मुलगा व्हेंटिलेटरवर आहे, तो वाचेल की नाही माहीत नाही, अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सध्या मुलावर उपचार सुरु असून आई- वडील त्याला वाचविण्यासाठी धडपडत आहेत.
मुलाला घेऊन नागपूरमध्ये वणवण भटकत असताना काही दलालांनी या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथे स्वस्तात उपचार होतील, असे देखील सांगितले. प्रत्यक्षात कमी खर्चात उपचार होत नाहीत. असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.