CMs order : शेतकऱ्यांचे मदतीचे पैसे दिवाळीपूर्वी जमा करा !

Chief Minister Fadnavis’ order to the District Collectors : मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mumbai : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. “कोणतीही सबब न सांगता दिवाळीपूर्वी आपत्तीग्रस्तांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा करा,” असे निर्देश त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आणखी ३३ जिल्ह्यांतील सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि रत्नागिरी या आठ जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Local Body Elections : सिंदखेड राजा नगरपरिषद मतदारयादीत गोंधळाचा भडका!

यंदाच्या पावसाळ्यात एकूण ६८.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत मंजूर झालेल्या २,२१५ कोटी रुपयांच्या निधीपैकी सुमारे १,७०० कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. उर्वरित निधीचे वितरण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सरकारने आपत्तीग्रस्तांसाठी एकूण ३१,६२८ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याची आवश्यक माहिती उपलब्ध असल्याने केवायसी प्रक्रिया आणि पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा करण्यात यावेत, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “काही जिल्हाधिकारी निधीअभावी किंवा शासन आदेशाची सबब सांगत आहेत, मात्र प्रत्येक जिल्ह्याला निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरेसा निधी उपलब्ध आहे, त्यामुळे कोणतीही कारणे न देता तातडीने मदत पोहोचवावी.”

Local body election : निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात एसआयआर मोहीम पुढे ढकलावी!

मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचित केले की, दिवाळीपूर्वी राज्यातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा लाभ मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी झोकून देऊन काम करावे. वेळ कमी असून अडचणींची कल्पना सरकारला आहे, मात्र जनतेला दिलासा मिळावा, त्यांची दिवाळी उजळून निघावी, यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरणार असून, दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप वेळेत पूर्ण होईल का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.